‘तुम जो मिल गये हो...’ प्रेमगीतांनी रिझविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:23 IST2019-05-21T00:22:17+5:302019-05-21T00:23:07+5:30
खांडेकर ऑकेस्ट्रा व नूपुर संगीत संचातर्फे शनिवारी सायंटिफिक सभागृहात ‘तुम जो मिल गये हो...’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमातील प्रेमगीतांनी श्रोत्यांना अक्षरश: रिझविले. रचना खांडेकर-पाठक यांनी हे शीर्षक गीत सादर करून श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळविली.

‘तुम जो मिल गये हो...’ प्रेमगीतांनी रिझविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खांडेकर ऑकेस्ट्रा व नूपुर संगीत संचातर्फे शनिवारी सायंटिफिक सभागृहात ‘तुम जो मिल गये हो...’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमातील प्रेमगीतांनी श्रोत्यांना अक्षरश: रिझविले. रचना खांडेकर-पाठक यांनी हे शीर्षक गीत सादर करून श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळविली.
पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा अजरामर आवाज आजही रसिकांच्या मनाचा खोलवर ठाव घेणाराच ठरतो. त्यांच्या गाण्यांची भुरळ आजही रसिकांना तेवढीच मोहून जाते. त्यांनी गायलेली अनेक प्रेमगीते हे आजही तरुणाईला साद घालतात..वेड लावतात. असेच एक गीत म्हणजे फिल्म ‘हसते जख्म’ चित्रपटातील ‘तुम जो मिल गये हो...’. हे आहे. रचना यांनी रफी यांचे गाणे हुबेहुब तालासुरात सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. यानंतर मिलिंद कोरटकर यांनी रफी यांचेच ‘आने से उसके आये बहार’ हे दुसरे प्रेमगीत अतिशय तरलतेने सादर केले. अभय पांडे यांनी सादर केलेल्या ‘दर्दे दिल दर्दे जिगर’ या गीताने श्रोत्यांनाही प्रेयसीच्या आठवणीच्या हिंदोळ्यात हळुवार झुलविले. डॉ. ममता खांडेकर यांनी लताबाई यांनी गायलेल्या प्रेमगीतांचा ‘स्वरगुच्छ’ सादर केला. यात ‘तेरे लिये पलकों की झालर बूनू, तूम सामने बैठे रहो, दूरी ना रहे कोई, कया जानू सजन, मेरे जीवनसाथी कली थी मै तो प्यासी, मेरे दिल में हल्की सी वो खलीश है’ या गीतांचा समावेश होता. मुश्ताक शेख यांनी ‘तेरे नाम’ चित्रपटातील गाजेलेले ‘तुमसे मिलना बाते करना बडा अच्छा लगता है’ या गीतावर श्रोत्यांनाही नादस्वरांवर तरंगवले. ‘आके तेरी बाहों मे, वादा रहा सनम या गीतावर मंत्रमुग्ध केले. पुष्पा जोगे यांनी ‘दिल तो है दिल’ हे गीत सादर केले. अभय पांडे यांनी ‘नीले नीले अंबर पर’ गीत सादर केले. संकल्पना रचना खांडेकर-पाठक यांची होती. संगीत संयोजन रमेश खांडेकर व पवन मानवटकर यांचे होते. उत्कृष्ट निवेदन डॉ. महेश तिवारी यांनी केले. की-बोर्डवर पवन मानवटकर, गिटारवर प्रकाश चव्हाण, ड्रम्सवर अशोक ठवरे, ढोलक व कांगोवर रघुनंदन परसतवार, ऑक्टोपॅडवर अक्षय हर्ले यांनी साथसंगत केली.