नागपूर : नाकातून रक्तस्राव होणे ही सामान्य बाब आहे. उन्ह वाढताच याची प्रकरणे वाढताना दिसून येतात. सामान्यत: कोरड्या हवेमुळे किंवा नाकात काही टोचल्याने हे घडते. योग्य काळजी घेतल्यास नाकातून रक्त येणे बरेचदा थांबते. बऱ्याचदा हा प्रकार हानिकारक नसतो; परंतु वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे कान, नाक व घसा रोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- तापमान ३३ अंशांवर
नागपूरचे तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत ते ३६ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हापासून बचावाच्या उपाययोजना आतापासूनच करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
-नाकातून रक्तस्राव होण्याचे दोन प्रकार
नाकातून रक्तस्राव होण्याचे दोन प्रकार आहेत. एक, नाकाच्या पुढच्या भागातून रक्त येते आणि दुसरे, ते नाकाच्या मागील भागाजवळील घशातून बाहेर येते. यामध्ये पहिला प्रकार सामान्य आहे, तर दुसरा प्रकार गंभीर आणि जास्त रक्त येऊ शकते. लहान मुलांमध्ये साधारणपणे दुसरा प्रकार दिसून येत नाही.
-नाकातून रक्त आल्यास काय कराल?
:: प्रथम म्हणजे घाबरू नका.
:: शांत राहा, खाली बसा आणि कमरेपासून थोडे समोर वाका.
:: झोपू नका आणि डोके मागे वाकवू नका.
:: बोटांनी नाकाचा मऊ भाग दाबा.
:: नाकांच्या दोन्ही बाजूंना बोटांचा दाब समान ठेवा.
:: दहा ते पंधरा मिनिटे नाक दाबून ठेवा
:: रक्तस्राव बंद होईपर्यंत दबाव कमी करू नका.
:: बर्फाने शेक दिल्यानेही मदत होते.
:: पंधरा ते तीस मिनिटांपर्यंत नाक दाबूनही रक्तस्राव होत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.
-रक्त येऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?
कोरड्या हवेचा निरंतर संपर्क, सतत ‘नेजल स्प्रे’चा वापर करणे, कोकेन किंवा तंबाखू सुंघल्याने सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो. यामुळे जेव्हा हवा अधिक कोरडी असेल तेव्हा खोलीत ‘ह्युमिडिफायर’ वापरणे फायदेशीर ठरू शकते. ‘सलाइन नेजल स्प्रे’ किंवा ‘जेल’च्या मदतीने आपले नाक ओलसर ठेवा. नाकात बोट टाकत असल्यास जखम होणार नाही याकडे लक्ष द्या. नखे नियमित कापा.