‘एनओसी’ मिळाली, निकालांचे काय?
By Admin | Updated: July 14, 2016 03:03 IST2016-07-14T03:03:57+5:302016-07-14T03:03:57+5:30
राज्य शासनाच्या ‘नाहरकत’ प्रमाणपत्राच्या गोंधळामध्ये शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

‘एनओसी’ मिळाली, निकालांचे काय?
नागपूर विद्यापीठ : शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाचे हिवाळी निकाल प्रलंबित
योगेश पांडे नागपूर
राज्य शासनाच्या ‘नाहरकत’ प्रमाणपत्राच्या गोंधळामध्ये शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षीच्या हिवाळी परीक्षांचे निकाल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्याप जाहीर केलेले नाही. विशेष म्हणजे २०१५-१६ या वर्षासाठी महाविद्यालयांना या आठवड्यातच ‘नाहरकत’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अशास्थितीत हिवाळी निकाल जाहीर होणार कधी, विद्यार्थी उन्हाळी परीक्षा देणार कधी आणि नवे सत्र सुरू होणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या ‘एनसीटीई’ने (नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन) देशभरात लागू केलेल्या नव्या निकषांनुसार ‘बीएड’ अभ्यासक्रम २०१५-१६ पासून दोन वर्षांचा करण्यात आला आहे. महाविद्यालयांनी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांतर्गत केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले व विद्यापीठाकडे नामांकन क्रमांकासाठी अर्जदेखील केले. परंतु
महाविद्यालयांनी राज्य शासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रियाच केली नाही. असे करणे महाविद्यालयांना अनिवार्य होते. अखेर विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांकडून अहवाल मागविले व संबंधित प्रस्ताव अहवाल राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाकडे आॅक्टोबर महिन्यात पाठविला. त्यानंतर विभागीय सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी तज्ज्ञमंडळींच्या सहकार्याने नागपूर विभागातील २०९ महाविद्यालयांची तपासणी केली व केवळ सहा महाविद्यालयांनीच नियमांची पूर्तता केल्याचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यानंतर राज्य शासनाने ‘नाहरकत’ प्रमाणपत्राच्या मुद्यावर मौन साधले होते.
तांत्रिक मुद्यावरून पुढे अडचण येऊ नये यासाठी नागपूर विद्यापीठाने ‘बीएड’, ‘एमएड’, ‘बीपीएड’, ‘एमपीएड’ या अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षा दोनवेळा पुढे ढकलल्या होत्या.