वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची क्रूर नीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 08:33 IST2025-12-10T08:33:16+5:302025-12-10T08:33:44+5:30
याशिवाय रानटी हत्ती, रानडुक्कर व अस्वलांच्या हल्ल्यात सहा शेतकऱ्यांचा बळी गेली आहे. हा आकडा धरल्यास वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेलेल्या बळीचा आकडा ७९ वर जातो.

वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची क्रूर नीती?
नागपूर : वाघांची संख्या वाढली. त्यांना जंगल अपुरे पडू लागले. बिबट्यासारखे मार्जार कुळातले प्राणी मानवी वस्तीत शिरू लागले. नागरी भाषेत मानव-वन्यजीव संघर्ष की काय तो उभा राहिला. समाजातल्या शहाण्या माणसांनी वर्णन केलेल्या या नव्या समस्येची दुसरी बाजू ही आहे की, टायगर सफारी, वनपर्यटनासाठी वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या नादात आता हे वाघ ज्यांनी शेकडो, हजारो वर्षे जंगले जपली, वाढवली ते आदिवासी व शेतकऱ्यांच्याच गत वर्षभरात विदर्भात तब्बल ६९ शेतकरी, आदिवासी स्त्री-पुरुषांचे बळी यात गेले आहेत. किड्यामुंग्यांचे आयुष्य वाट्याला आलेली विदर्भातील दुबळी माणसे वाघांना खाऊ घातली जात आहेत.
रानडुक्करं, अस्वलं आणि रानटी हत्तींचेही बळी
याशिवाय रानटी हत्ती, रानडुक्कर व अस्वलांच्या हल्ल्यात सहा शेतकऱ्यांचा बळी गेली आहे. हा आकडा धरल्यास वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेलेल्या बळीचा आकडा ७९ वर जातो.
पर्यटकांना जंगल व वाघ पाहायला मिळावेत म्हणून जंगलात राहणाऱ्या गरीब, दुबळ्या लोकांनी वाघांच्या जबड्यात त्यांची मानगुट का द्यायची, हा विदर्भातील भोळ्याभाबड्या माणसांचा सरकारला, व्यवस्थेला सवाल आहे.
व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यासाठी आधी विदर्भातील अरण्यप्रदेशावर विस्थापनाचे संकट होते. त्यातून कशीबशी सुटका होत नाही तोवर आता हे वाघांचे संकट उभे राहिले आहे.
वन्य प्राण्यांच्या दहशतीतील वैदर्भीयांचा सवाल
वाघ-बिबट्यांच्या या ६९ बळींमध्ये ५२ बळी शेतकरी व वनउपज गाेळा करणाऱ्या ग्रामस्थांचे तर ११ बळी हे गुराख्यांचे आहेत.
मानव वन्यजीव संघर्ष थांबविण्यात वनविभागाला अपयश आले आहे हे मान्यच करावे लागेल, यासाठी वन विभागाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काही उपाययोजना प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. सोबतच पीआरटी कमिट्यांची संख्या वाढवावी. अधिकाधिक वाघांचे इतर अभयारण्यात स्थानांतरण करायला हवे. एका जिल्ह्यात ४५ च्या आसपास लोक वाघाचे भक्ष्य बनत असतील तर ते दुर्दैवी आहे. मी वनमंत्री असताना २५ लाखांची मदत जाहीर केली होती. ती आता ५० लाख करण्याची गरज आहे. पण, मुळात मदत देण्याची वेळच होऊ नये अशा उपाययोजना व्हाव्यात. माणसांचा जीव वाचवणे हे अधिक महत्त्वाचे.
सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री,