बजेटने मला काय दिले रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:15+5:302021-02-05T04:47:15+5:30
- बजेट २०२१ : काही जण शॉक्ड, तर काही मारताहेत चिल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अवाढव्य असा देशाचा ...

बजेटने मला काय दिले रे भाऊ?
- बजेट २०२१ : काही जण शॉक्ड, तर काही मारताहेत चिल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवाढव्य असा देशाचा अर्थसंकल्प हा थोरामोठ्यांचा खेळ आणि त्यांचेच नियोजन. सर्वसामान्यांपर्यंत या अर्थसंकल्पाची झळ अथवा लाभ नेतृत्वाच्या अंमलबजावणीपूर्वीच पोहोचते. कमाईतून होणारे उत्पन्न किती काळ खिसा जड राहतो आणि किती लवकर तो खाली होतो यावरच सर्वसामान्यांची प्रतिक्रिया उमटत असते. बजेटने मला काय द्यायला हवे, ही सर्वसामान्यांची अवाजवी अपेक्षा सरकार दरबारी कायम असते आणि बजेटने मला काय दिले, या सवालाचे उत्तर कायम संभ्रमित पाडणारे असते. १ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर मिळालेल्या प्रतिक्रिया, अशाच आहेत.
व्यापाऱ्यांना ठेंगा
अर्थसंकल्पाचा विचार केला तर तो चांगलाच आहे. गरीब, शेतकरी यांना प्रचंड दिलासा आहे. मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी असलेल्या लहान व्यापाऱ्यांसाठी कुठलीच सवलत प्राप्त झालेली नाही. आम्हाला उत्पन्न करात पाच लाख रुपयांपर्यंतची सवलत हवी होती, ती मिळाली नाही. व्यापारी या नात्याने आम्हाला थोडीही सवलत नाही तर गुंतवणूक कशी करावी, हा प्रश्न आहे. त्याचमुळे थोडी निराशा हाती लागली आहे.
- शिवप्रताप सिंह, वरिष्ठ उपाध्यक्ष, नागपूर किराणा असोसिएशन
ज्येष्ठांची स्थिती गंभीर
ज्येष्ठांची विशेषत: निराधार ज्येष्ठांची स्थिती अतिशय गंभीर आहे. वृद्धांना मिळणारी पेन्शन अजूनही पाचशे ते हजार रुपयेच आहे. वर्तमानकाळात, एवढी रक्कम कितीशी उपयोगी ठरणार हा विचार करणे अपेक्षित होते. किमान तन हजार पेन्शन सुरू व्हायला हवी होती. सुरक्षेचा प्रश्न तर मोठा आहे. पोलिसांकडून ज्येष्ठांची वेळोवेळी विचारपूस होणे गरजेचे आहे. त्याकडे सरकारने दुर्लक्षच केले आहे. सरकार घोषणा उत्तम करते. मात्र, अंमलबजावणी होईल का, ही शंका आहे.
- लीलाधर बेंद्रे, ज्येष्ठ नागरिक मंडळ
हातावर पोट भरणाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण नाही
कोरोनाकाळातील स्थितीचा विचार केल्यास, यंदाचा अर्थसंकल्प अवजड असणार, हे निश्चितच होते. त्यादृष्टीने अर्थसंकल्प चांगलाच आहे. मात्र, साधारण व्यक्तीला या अर्थसंकल्पातून बऱ्याच अपेक्षा होत्या. त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. ऑटोचालक, मजूर अशा हातावर पोट भरणाऱ्यांचा विचार झालेला नाही. त्यामुळे, हा अर्थसंकल्प उत्तम असला तरी समाधानकारक नक्कीच नाही.
- चरणदास वानखेडे, महासचिव, ऑटोचालक महासंघ
दीडपट हमीभाव म्हणजे दीडपट धूळफेक
शेतमालाचा उत्पादन खर्च काढण्याची प्रक्रियाच अत्यंत सदोष असल्याने सोयीची आकडेवारी वापरून कागदोपत्री काढलेला उत्पादन खर्चच बनावट असतो. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या दीडपड एमएसपी देण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा म्हणजे चक्क दीडपट धूळफेक ठरते. शासकीय किंवा विद्यापीठीय शेतीत प्रत्यक्ष प्रायोगिक तत्त्वावर शेती करून आदर्श मॉडेलच्या आधारावर जोपर्यंत उत्पादन खर्च काढण्याच्या निर्दोष प्रक्रियेचा अवलंब केला जात नाही तोपर्यंत एमएसपीच्या दीडपट हमीभाव या घोषणेत ‘कागदावरच्या आकडेवारीची कढी अन् कागदावरच्या आकडेवारीचा भात’ यापलीकडे अजिबात तथ्य नाही.
- गंगाधर मुटे, प्रदेशाध्यक्ष, माहिती व तंत्रज्ञान आघाडी, शेतकरी संघटना
कामगारांसाठी काहीच नाही
कोरोनाकाळाचा विचार करता आरोग्याचा विचार मोठ्या प्रमाणात केला गेला, हे ठीकच आहे. मात्र, त्यापुढे जाऊन कामगारांसाठी काहीच सवलत नाही. उत्पन्न कराबाबत कुठलाच दिलासा मिळालेला नाही. एक्साइज ड्यूटी बाद केली म्हटले जात आहे. मात्र, त्याऐवजी सेस लावलेलाच आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाही त्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीची हेराफेरी आहे. त्यामुळे, अर्थसंकल्पात तथ्य नाही.
- अतुल सेनाड, अध्यक्ष, नागपूर आडतिया असोसिएशन
भाजीपाल्याकडे कोण लक्ष देतो
भाजीपाला हा विषय उत्पन्नानंतर तात्काळ विकला जाणारा विषय आहे. शेतकऱ्यांसाठी बऱ्याच गोष्टी अर्थसंकल्पात आहेत. भाजीपाला उत्पादन हा शेतीचाच विषय असला तरी विशेष असे कधीच काही मिळत नाही. आपल्या भागात संत्रा, मिरची मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाते. अवकाळी पावसात प्रचंड नुकसान झाले. त्याबाबत कायमस्वरूपी कुठल्याच अशा तरतुदी नाहीत.
- राम महाजन, सचिव, महात्मा फुले भाजी व फळे आडतिया असोसिएशन
महिला नोकरदारांना विशेष अपेक्षा
अर्थसंकल्प उत्तम असला तरी सिंगल पॅरेंटिंग महिला, नोकरदार महिलांना विशेष तरतूद अपेक्षित होती. एकट्या महिलांच्या सुरक्षेचा विषय महत्त्वाचा आहे. त्यावर या अर्थसंकल्पात भर देणे अपेक्षित होते. गृहकर्जाच्या बाबतीत पुरुषांच्या तुलनेत महिलांना झुकते माप देणे गरजेचे आहे. त्याचा विचार झालेला नाही. पेट्रोलचे दर वाढल्याने महागाई वाढणार आणि त्याअन्वये घरखर्चाचा भारही वाढणार आहे.
- नीता खोत, मराठी विभाग प्रमुख, सोमलवार हायस्कूल
महागाईत घर कसे सांभाळावे
या अर्थसंकल्पात महिला वित्तमंत्री या नात्याने गृहिणींचा विचार होणे अपेक्षित होते. मात्र, देशाचा विचार करता गृहिणींकडे पाठ फिरवली गेली असल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वच गरजेच्या वस्तू महाग होणार असल्याने महागाईत घर कसे सांभाळावे, हा एक गृहिणी म्हणून प्रश्न पडला आहे. कोरोनाकाळात आधीच आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत महागाई हा प्रत्येक गृहिणीसाठी ऐरणीचा विषय ठरलेला आहे.
- विनिता कुळकर्णी, गृहिणी
...........