हा कोणता ‘क्लास’
By Admin | Updated: April 30, 2015 02:15 IST2015-04-30T02:15:23+5:302015-04-30T02:15:23+5:30
सर्वात सुरक्षित आणि स्वस्त प्रवास या दृष्टिकोनातून रेल्वेकडे पाहिले जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे.

हा कोणता ‘क्लास’
दयानंद पाईकराव नागपूर
सर्वात सुरक्षित आणि स्वस्त प्रवास या दृष्टिकोनातून रेल्वेकडे पाहिले जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावरील परिस्थितीवर कटाक्ष टाकल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा दोन्ही प्रवाशांना सुविधा व सुरक्षा पुरविण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे लक्षात येते. ‘वर्ल्ड क्लास’ रेल्वेस्टेशन म्हणून होत असलेला उल्लेख कुठल्या धर्तीवर केला जातो, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
प्रवेशाची अनेक दारे
नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेशद्वारे असल्यामुळे असामाजिक तत्त्वांचे चांगलेच फावत आहे. यामुळे पाकिटमार प्रवाशांच्या महागड्या वस्तू पळवून थेट रेल्वेस्थानकाबाहेर पडतात. अनेक पळवाटा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाचे जवान उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या असामाजिक तत्वांना कशाचीच चिंता उरत नाही. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील पळवाटा बंद करून असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
बर्थचे आमिष दाखवून फसवणूक
बर्थ मिळवून देतो असे सांगून प्रवाशांची फसवणूक करण्याच्या घटनाही रेल्वेस्थानकावर घडत आहेत. बर्थ मिळण्यासाठी प्रवाशांकडून हे समाजकंटक पैसे वसूल करतात. त्यानंतर प्रवाशांना त्यांचे नाव, पत्ता विचारून बर्थ क्रमांक घेऊन येतो असे सांगून एका ठिकाणी बसावयास सांगतात. त्यानंतर हे समाजकंटक आरक्षण कार्यालयात जाऊन त्या प्रवाशाचे तिकीट रद्द करून त्याच्या तिकिटाचे पैसेही घेऊन पळ काढतात.
पूर्वेकडील भागातही अनागोंदी कारभार
पूर्वेकडील भागात आॅटोचालक रस्त्यावर आॅटो उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. येथे ड्युटीवर असलेले लोहमार्ग पोलीसही त्यांना हटकण्याऐवजी पोलीस बुथमध्ये बसलेले आढळतात. याशिवाय या भागातील आरक्षण कार्यालयातही पाकिटमार नेहमीच प्रवाशांचे पाकीट, मोबाईल पळविण्याच्या घटना घडत असतात.
उन्हाळ्यात पंखेही झाले बंद
उपराजधानीत ऊन चांगलेच तापत आहे. अशा परिस्थितीत रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी पंखे लावण्यात आलेले आहेत. परंतु यातील बहुतांश पंखे बंद अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी बंद असलेले पंखे सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कुठलीच तसदी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे बंद असलेले पंखे सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी घाण
नागपूर रेल्वेस्थानकावर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील संस्थांनी वॉटर कूलर भेट दिले आहेत. परंतु या वॉटर कूलरच्या बाजूला कचरा आणि घाण साचल्यामुळे तेथे उभे राहण्याची इच्छाही होत नाही. यामुळे अशा घाणीच्या वातावरणात उभे राहून पिण्याचे पाणी भरून घेण्याची पाळी प्रवाशांवर येत आहे. रेल्वे प्रशासनाने या वॉटर कूलरच्या भागात नियमित सफाई करून प्रवाशांना स्वच्छ वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.
अवैध व्हेंडरचा बंदोबस्त करण्याची गरज
नागपूर रेल्वेस्थानकाच्या इटारसी एण्डकडील आणि लोहापुलाकडील भागातून अवैध व्हेंडर गाडीचा वेग कमी झाल्यानंतर गाड्यात चढतात. ते आपल्याजवळील निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री प्रवाशांना करतात. त्यामुळे या अवैध व्हेंडरचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चालू तिकीट कार्यालयात अनागोंदी
रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या चालू तिकीट कार्यालयाच्या परिसरातील हॉलमध्ये प्रवासी नेहमीच झोपलेले असतात. त्यामुळे या हॉलमध्ये नेहमीच गर्दीचे चित्र दिसते. चालू तिकीट कार्यालयातील खिडक्यांवरही बरीच गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमार नेहमीच प्रवाशांचे पाकिट, महागडे मोबाईल पळविण्याच्या घटना घडतात. या ठिकाणी ड्युटी लावलेले लोहमार्ग पोलीसही तेथे उपस्थित राहत नसल्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्वच्छतेच्या कंत्राटाअभावी दुर्गंधी
रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावरील स्वच्छतेसाठी एका खाजगी संस्थेला कंत्राट दिले होते. परंतु मागील दीड महिन्यापासून या संस्थेचे कंत्राट रद्द करण्यात आले. तेव्हापासून रेल्वेस्थानकावरील स्वच्छता पार ढासळली आहे. प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थांची पाकिटे, केळीची टरफले फेकलेली आढळतात. तर रेल्वे रुळावरही कमालीची अस्वच्छता असल्यामुळे दुर्गंधी पसरल्याचे चित्र दृष्टीस पडते.