‘फासकी’चे सत्र सुरुच, कारवाईचे काय?

By Admin | Updated: November 24, 2015 00:28 IST2015-11-23T23:17:51+5:302015-11-24T00:28:02+5:30

रत्नागिरी जिल्हा : दोन वर्षात नऊ बिबटे अडकले, तिघांचा मृत्यू

What is the action of 'phaski' session? | ‘फासकी’चे सत्र सुरुच, कारवाईचे काय?

‘फासकी’चे सत्र सुरुच, कारवाईचे काय?

सुभाष कदम -- चिपळूण --सध्या जिल्ह्यात बिबट्यांची संख्या कमालीची वाढली आहे. वन्य प्राण्यांसाठी लावलेल्या फासकीमध्ये बिबटे अडकून जखमी होत आहेत. गेल्या दोन वर्षात ९ बिबटे फासकीत अडकले. त्यापैकी तीन बिबट्यांचा तडफडून मृत्यू झाला, पाचजणांना वनखात्याने वाचवले तर एका बिबट्याला उपचारासाठी माणिकडोह येथे पाठवले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने बिबटे फासकीत अडकत असताना फासकी लावणाऱ्यांवर कोणतीही कठोर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. राज्यात ‘वाघ वाचवा’ मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. वाघासाठी वनखात्यातर्फे स्वतंत्र जंगलही आरक्षीत केले आहे. मानवी वस्तीत येऊन बिबटे किंवा वाघ माणसावर हल्ला करण्याच्या घटना राज्यात वाढल्या आहेत. याचा विचार करता जंगलातच या प्राण्यांना अधिवास मिळावा यासाठी वनखात्यातर्फे दरवर्षी नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत. मात्र तरीही विहिरीत पडून, रस्ता ओलांडताना अपघात झाल्याने किंवा वयोमानानुसार नैसर्गिक मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. काहीवेळा रानडुक्करांसाठी किंवा इतर प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात फासकी लावली जाते. या फासकीत काहीवेळा बिबटे अडकून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी फासकीवर बंदी घातली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ ०.८ टक्के वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र सह्याद्रीच्या टोकावर डोंगराळ भागात आहे. जेथे जाणेही अवघड असते अशा भागात अनेक हिंस्त्र प्राणी व बिबटे आढळतात. वनखात्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही ते आपले काम प्रामाणिकपणे बजावताना दिसतात. अगदी वृक्षतोड परवाना देण्यापासून ते हल्ला झालेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई देण्यापर्यंतची अनेक कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागतात. २०१३-१४ या वर्षात १६ बिबटे जखमी होण्याच्या व मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडल्या. यापैकी ५ बिबट्यांना वनखात्याने जीवदान दिले तर ११ बिबटे मृत्युमुखी पडले. त्यामध्ये वाहनाने धडक दिल्यामुळे २, नैसर्गिक मृत्यू ६ व फासकीत अडकून ३ बिबट्यांचा मृत्यू झाला. सन २०१४-१५ मध्ये ४ बिबटे फासकीत अडकले होते. यापैकी ३ बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे तर धामणवणे येथे सापडलेल्या बिबट्याला माणिकडोह येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.


गुहागर कीर्तनवाडी येथे एक बिबट्या ४ दिवस फासकीसह फिरत होता. नागरिकांनी याबाबत माहिती देताच जनरेटर लावून त्याला पकडले. उपचारासाठी त्या बिबट्याला माणिकडोह येथे पाठविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्या बिबट्याचा मृत्यू झाला. परिक्षेत्र वनाधिकारी बी. आर. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी निकराचे प्रयत्न केले पण यश आले नाही. आता धामणवणे येथील बिबट्यालाही उपचारासाठी माणिकडोह येथे पाठविण्यात आले आहे.


बिबट्याला सध्या जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. गेल्या वर्षभरात २ बिबट्यांचा भूकबळी गेला आहे. अन्नावाचून हाल होत असल्याने बिबटे आता मानवीवस्तीत आपले बस्तान बांधत आहेत. त्यामुळे जनावरे व श्वानांवर ते ताव मारतात. ग्रामीण भागात बिबट्यांची संख्या कमालीची वाढली आहे. दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत आहे. म्हणून त्याची शिकार करणे हा उपाय नाही. असे आढळल्यास ठोस कारवाई होईल, असा इशारा वनखात्यातर्फे देण्यात आला आहे.


बिबट्या हा साधारणपणे १७ वर्ष जगतो. ओणीत (राजापूर) डिसेंबरमध्ये दुर्मिळ काळ्या जातीचा बिबट्या आढळला होता. सध्या जंगलामध्ये बिबट्यांना उपजीविकेसाठी खाद्य मिळत नसल्याने ते हळूहळू मनुष्यवस्तीकडे सरकत आहेत. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वी आलटून - पालटून नागली केली जायची. या भागात तृणभक्षक प्राणी मोठ्या प्रमाणावर असत. त्यांच्यावर गुजराण करणारे बिबट्यासारखे प्राणी त्याच भागात राहत. आता नागली गेली त्यामुळे तृणभक्षक प्राणीही कमी झाले.


ज्या गावात फासकी लावली जाईल त्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना पोलीसपाटलाने दिली नाही तर त्याचे वेतन थांबवण्याची घोषणा तत्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दीपक पांडे यांनी केली होती. एका पोलीसपाटलावर अशी कारवाई झाली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही कारवाई झालेली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे व विभागीय वनाधिकारी विकास जगताप यांनी सर्व पोलीसपाटलांना याबाबत लेखी पत्र पाठवले आहे. मात्र, त्यानंतरही कारवाई झालेली नाही.



वनखाते बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करते. ग्रामस्थांनीही शिकारीसाठी फासकी लावून बिबट्यांचा बळी घेऊ नये. हा गुन्हा आहे. ज्यांच्या जागेत फासकी असेल किंवा ज्याने फासकी लावली असेल त्याच्यावर यापुढे कठोर कारवाई केली जाणार आहे.
-विकास जगताप, वनाधिकारी, चिपळूण


ज्या बागेत बिबट्यासाठी फासकी लावण्यात आली होती, त्या फासकी लावणाऱ्या शेतकऱ्यावर तातडीने कारवाई करावी. कोणालाही पाठीशी घालू नये अन्यथा आपण मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही.
-दादा बैकर,
तालुकाध्यक्ष बहुजन समाज पक्ष, चिपळूण


मृत्यूचे प्रमाण जास्त
लांजा, संगमेश्वर, राजापूर येथे असलेल्या गावांमध्ये बिबट्यांची संख्या अधिक आहे. या भागातच बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसते.

Web Title: What is the action of 'phaski' session?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.