What about online education of poor children? | गरीब मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचे काय?

गरीब मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचे काय?

ठळक मुद्देस्मार्टफोन असलेल्यांनाच मिळणार ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांत निर्माण होणार भेदभाव, ग्रामीण भागातही समस्या

गणेश हूड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार खासगी शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. दुसरीकडे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यायचे यावरून शिक्षण विभागच गोंधळात आहे. १ जुलैपासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होणार आहेत. परंतु ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहेत अशाच विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभागी होता येईल. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मनपा शाळात प्रामुख्याने गरीब व मध्यम वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेतात. खासगी शाळांच्या तुलनेत मनपा शाळा शिक्षणाच्या बाबतीत मागे आहेत. त्यात ऑनलाईन शिक्षणामुळे मनपा शाळेतील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनस्तरावर अद्याप यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणच घ्यायचे नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. इयत्ता नववी व दहावीतील ६० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहेत. ४० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत.

आम्ही सुरू करतोय ऑनलाईन शिक्षण
मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शाळा सुरू करण्याची प्रशासनाकडून परवानगी नसल्याने आम्ही ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. सध्या नवव्या व दहाव्या वर्गावर आमचा फोकस आहे. त्यासाठी आम्ही पालकांकडून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यासंदर्भातील अभिप्राय मागविले आहेत. आमच्या येथे ऑनलाईन शिक्षणाला १ जुलैपासून सुरुवात होणार आहे, असे खामल्यातील सोमलवार निकालसचे मुख्याध्यापक विवेक जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, ऑनलाईन शिक्षण काहीसे अवघड असले तरी, सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळांना पर्याय नाही. मुळात मुलांचे शिक्षणिक नुकसान होऊ नये, त्यामुळे आम्ही नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांवर विशेष फोकस केला आहे. गुगल मिटच्या माध्यमातून आमचा ऑनलाईन वर्ग दररोज होणार आहे. शिक्षक शाळेत येऊन नेहमीप्रमाणे शिकविणार आहे. गुगल मिटच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी शिक्षकांसोबत कनेक्ट होणार आहेत. दररोज दुपारी दोन तासिका आम्ही घेणार आहोत. आम्ही ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यापूर्वी पालकांचा सर्व्हे केला. त्यात ९६ टक्के पालकांनी आम्हाला परवानगी दिली. आम्ही पालकांना ऑनलाईनचे पर्याय काय आहे, ते उपलब्ध होऊ शकतात का? याची विचारणा केली. पालकांना सोयीचे होईल, त्या वेळेत आम्ही ऑनलाईन शिक्षण देणार आहोत.

मनपा शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षकांना बोलावून विद्यार्थी व पालकांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र यासंदर्भात विभागाकडून स्पष्ट निर्देश नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन संपर्क करणारी यंत्रणाही सक्षम नाही. शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. शिक्षण विभागातच गोंधळ आहे.

प्रशासनाने निधी उपलब्ध करावा
मनपा शाळातील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती विचारात घेता, ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी मनपाने विशेष निधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांना स्मार्टफोन व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कोविड-१९ मुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याने कोविड नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीचा वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे.

मंत्री, आमदार-खासदारांनी निधी उपलब्ध करावा
महापालिका व जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शहरातील तीन खासदारांनी प्रत्येकी ५० लाख निधी उपलब्ध करावा. कोविडमुळे यात अडचण येणार असेल तर विशेष बाब म्हणून केंद्र सरकारकडून यासाठी मंजुरी द्यावी. तसेच सर्व जिल्ह्यातील खासदारांनी प्रत्येकी १० लाखांचा निधी उपलब्ध केल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे सहज शक्य आहे. शिवाय पालकमंत्र्यांसह इतर मंत्री, आमदारांनी डीपीसीतून निधी उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा. इतकेच नव्हे तर नागपुरातील विविध उद्योगांकडून सीआरएसचा निधीसुद्धा यासाठी वापरला जाऊ शकतो.

सर्वांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न
१ जुलैपासून मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट आहेत अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. मात्र ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही. सर्व विद्यार्थ्यांनाऑनलाईन शिक्षण देण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
प्रीती मिश्रीकोटकर, शिक्षणाधिकारी, मनपा

Web Title: What about online education of poor children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.