आठवडी बाजार बंद, भाज्यांचे भाव उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:06 IST2021-03-29T04:06:26+5:302021-03-29T04:06:26+5:30
नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णामुळे शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा बाजार बंद झाल्याने अनेकांचा रोजगार ...

आठवडी बाजार बंद, भाज्यांचे भाव उतरले
नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णामुळे शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा बाजार बंद झाल्याने अनेकांचा रोजगार हिरावला असून सुरू करण्याची किरकोळ भाजी विक्रेत्यांची मागणी आहे.
मनपा प्रशासनाने आठवडी बाजार भरविण्यास बंदी घातल्याने भाज्यांच्या विक्रीत घसरण झाली आहे. स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढली, पण विक्री कमी असल्याने भाव उतरले आहेत. किरकोळ विक्रेते गल्लीबोळात ठेल्यावर फिरून विक्री करताना दिसत आहेत. भाव मिळत नसल्याने अनेक विक्रेते चारचाकी वाहनांवर चौकाचौकात भाज्यांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. कमी भावामुळे उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शहरातील आठवडी बाजार सुरू करण्याची विक्रेत्यांची मागणी आहे. पण वाढत्या रुग्ण संख्येमुळे मनपा प्रशासनाने मनाई केली आहे. सध्या कळमना भाजी बाजार आणि कॉटन मार्केट बाजारात भाज्यांची आवक पूर्वीपेक्षा दुपटीवर गेली आहे. दोन्ही बाजार सकाळी ९ पर्यंत सुरू राहात असल्याने विक्री कमी झाली आहे. याशिवाय कोरोना रुग्णांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याने दोन्ही बाजारात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याच कारणांनी गेल्यावर्षी दोन्ही बाजार मनपा आयुक्तांनी बंद करून मैदानात बाजार सुरू केले होते. हीच स्थिती सध्या उद्भवली असून रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास दोन्ही बाजार बंद होतील, अशी भीती ठोक भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.
आठवडी बाजार बंद असल्यामुळे फूलकोबी, पत्ता कोबी, पालक, मेथी, टोमॅटो आदींचे भाव उतरले आहेत. फूलकोबी व पत्ता कोबी १० रुपये, पालक ५ रुपये, मेथी १० रुपये, टोमॅटो ५ ते १० रुपये, कोथिंबीर १० रुपये, हिरवी मिरची १० रुपये किलो भाव आहेत. याशिवाय कळमना बाजारातही कांदे, बटाटे आणि लसणाचे भाव कमी झाले आहेत. विक्रीत घसरण झाल्याने दररोज ३० ते ४० टक्के माल पडून राहत आहे. मात्र, दररोज आवक तेवढीच आहे. त्यामुळे माल कुठे साठवून ठेवायचा, असा प्रश्न ठोक विक्रेते आणि अडतिया यांच्यासमोर उभा राहिला आहे. कळमना बाजारात पांढरे कांदे १० ते १२ रुपये किलो, लाल कांदे १२ ते १३ रुपये, बटाटे ९ ते ११ रुपये आणि लसूण ६० ते ७० रुपये किलो भाव आहेत. भाव कमी असले तरीही किरकोळमध्ये दुपटीत विकल्या जात आहेत.