आम्ही बांगलादेशच्या हिंदूंच्या पाठीशी, त्यांच्या रक्षणासाठी सर्व उपाय करणार - सुनील आंबेकर 

By योगेश पांडे | Updated: December 10, 2024 21:33 IST2024-12-10T21:32:01+5:302024-12-10T21:33:15+5:30

नागपुरात संघ परिवारातील विविध संघटनांकडून बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात हुंकार

We will stand by the Hindus of Bangladesh and take all measures to protect them - Sunil Ambekar  | आम्ही बांगलादेशच्या हिंदूंच्या पाठीशी, त्यांच्या रक्षणासाठी सर्व उपाय करणार - सुनील आंबेकर 

आम्ही बांगलादेशच्या हिंदूंच्या पाठीशी, त्यांच्या रक्षणासाठी सर्व उपाय करणार - सुनील आंबेकर 

नागपूर : ज्या बांगलादेशचा जन्म भारतामुळे झाला तेथील कट्टरपंथी लोक आज हिंदू समाजाविरोधात कृतघ्नपणे वागत आहेत. अन्याय-अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहे. मात्र तेथील हिंदूंनी या परिस्थितीतदेखील संघर्ष सुरू ठेवला आहे. भारतातील प्रत्येक नागरिक बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीशी आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाची बांगलादेश सरकारसोबत चर्चा सुरू आहेच. मात्र वेळ पडली तर तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी सर्व उपाय करण्यात येतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले. मंगळवारी नागपुरात संघप्रणित संघटनांनी सकल हिंदू समाजाच्या बॅनरअंतर्गत बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार केला. त्यावेळी आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.

सकल हिंदू समाजाद्वारे विधानसभा मतदारसंघनिहाय मोर्चा काढण्यात आला. याअंतर्गत सतरंजीपुरा चौक (पूर्व नागपूर), छावणी चौक (पश्चिम नागपूर), कमाल चौक (उत्तर नागपूर), सक्करदरा चौक (दक्षिण नागपूर), बडकस चौक (मध्य नागपूर) तर अजनी चौक (दक्षिण-पश्चिम नागपूर) येथून मोर्चे निघाले व सर्वांचे व्हेरायटी चौकात एकत्रीकरण झाले. दुपारी चार वाजताच्या सुमारास व्हेरायटी चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांनी केवळ दु:खी न होता मनात संताप निर्माण झाला पाहिजे. आम्ही पाकिस्तान, बांगलादेशमधील हिंदू समाजाला आपलेच मानतो. येथे कुठल्याही जातीचा प्रश्न येत नाही, तर अन्याय हिंदूंवर होत आहे हे विचारात घेतले पाहिजे. तेथील लोक मंदिरांमधील मूर्ती तोडत आहेत व तो आपल्या भावनांवर आघात आहे.

आपल्या देशातील काही नेते म्हणतात सर्वकाही विसरा असे म्हणतात. मात्र वेळोवेळी घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना, दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, हिंदूंच्या हत्याकांडाच्या घटना आपल्याला काहीही विसरु देत नाहीत. भारतातील हिंदूंची शक्ती लक्षात घेऊन बांगलादेश शासनाने तेथील अत्याचार थांबविले पाहिजेत. हिंदूंवरील अन्याय आता सहन करण्यात येणार नाही याची जाणीव तेथील पंतप्रधानांनी ठेवली पाहिजे, असा इशारा आंबेकर यांनी दिला. बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीशी आपण आता उभे राहिलो नाही तर तेथील कट्टरपथींयांची हिंमत वाढेल व येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. केवळ एका रॅलीपुरता हा संघर्ष मर्यादित रहायला नको असे आवाहन आंबेकर यांनी केले. यावेळी भाजपचे नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, आ.कृष्णा खोपडे, ॲड.धर्मपाल मेश्राम, अमोल ठाकरे, रमेश मंत्री, विश्वमांगल्य सभेच्या सविता मते, डॉ.विश्वास आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जन्म दिला तर अंतदेखील करू शकतो
विहिंपचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी बांगलादेश सरकारवर टीकास्त्र सोडले. भारताने बांगलादेशला जन्म दिला. मात्र जन्म देणारा भारत त्यांचा अंतदेखील करू शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे. भारताचा अहिंसेवर विश्वास असला तरी शस्त्र चालविणे आम्ही विसरलेलो नाही. भारतात बांगलादेशचे अनेक लोक राहतात. त्यांचादेखील तेथील शासनाने विचार करायला हवा, असे शेंडे यांनी म्हटले.

बांगलादेशसोबतच व्यापार बंद करा
बांगलादेशला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यांना योग्य धडा शिकविण्यासाठी त्यांचा वीज पुरवठा, आर्थिक सहकार्य बंद केले पाहिजे. तसेच त्यांच्याशी सर्व प्रकारचा व्यापार बंद केला पाहिजे. अशा उपायांनीच तो देश वछणीवर येईल, असे प्रतिपादन सविता मते यांनी केले.

Web Title: We will stand by the Hindus of Bangladesh and take all measures to protect them - Sunil Ambekar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.