‘स्प्रेडर्स’ना आधी रुग्णालयात, नंतर कोठडीत पाठवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST2021-03-14T04:08:23+5:302021-03-14T04:08:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कारण नसताना रस्त्यावर किंवा बाजारात ‘स्प्रेडर्स’ फिरताना आढळल्यास त्यांना आधी रुग्णालयात आणि नंतर कोठडीत ...

‘स्प्रेडर्स’ना आधी रुग्णालयात, नंतर कोठडीत पाठवू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारण नसताना रस्त्यावर किंवा बाजारात ‘स्प्रेडर्स’ फिरताना आढळल्यास त्यांना आधी रुग्णालयात आणि नंतर कोठडीत पाठविले जाईल. कोरोनाचा धोका वाढविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करू, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला. सोमवारपासून उपराजधानीत लॉकडाऊन राहणार आहे. त्यासंबंधाने पोलिसांचा बंदोबस्त कसा राहील, त्याची माहिती आज पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना दिली. आपल्यामुळे इतरांना कोरोनाची बाधा होऊ शकते, हे माहिती असूनही कोरोनाबाधित व्यक्ती रस्त्यावर, बाजारात फिरत असल्याच्या तक्रारी आहेत. या बाबीकडे आयुक्तांचे लक्ष वेधले असता त्यांनी ही बाब अतिशय गंभीर असल्याचे म्हटले. काही कोरोनाबाधित ओला, उबेर, ऑटो घरी बोलवितात. बाजारात जातात आणि नंतर घरी परततात. वाहनचालकाला ते कोरोनाबाधित असल्याची कल्पना नसते. तो नंतर त्याच स्थितीत दुसऱ्या प्रवाशांना सोबत घेऊन सर्वत्र फिरतो, हा प्रकार फारच भयावह असल्याचे आयुक्त म्हणाले. संबंधितांची संवेदनशीलता संपली की काय, अशी शंका यातून येते असे म्हणतानाच त्यांनी कोरोनाचा धोका इतरांना निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.
नागपुरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. हा उद्रेक रोखण्यासाठी आम्ही हरसंभव प्रयत्न करणार आहोत. लॉकडाऊनदरम्यान कोणत्याच नागरिकाला त्रास होणार नाही, याची आम्ही पुरती काळजी घेऊ. त्यासाठीच अन्नधान्य, किराणा, भाजी, ब्रेड, दूध, फळ अन् अत्यावश्यक चिजवस्तूंच्या पुरवठ्यासोबत औषधांची दुकान खुली राहणार आहेत. ते खरेदी करण्यास नागरिक बाहेर पडू शकतात. मात्र, खामल्यात राहत असेल आणि भाजी घेण्याच्या नावाखाली कुणी सीताबर्डीत फिरत असेल तर त्याला सोडले जाणार नाही. क्वॉरन्टाइनचा शिक्का ज्यांच्या हातावर आहे, अशांना तर अजिबातच रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही. आवश्यक कामाच्या निमित्ताने दुचाकीवर एक आणि चारचाकी वाहनात दोन व्यक्ती घराबाहेर पडू शकतात. मात्र, पेशंट असेल तर दुचाकीवर दोन आणि चारचाकी वाहनात तीन व्यक्ती जाण्यास मुभा आहे. प्रत्येकाजवळ ओळखपत्र अन् घराबाहेर पडण्याचे ठोस कारण असेल तरच पोलीस त्याला सोडतील, अन्यथा त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. भाजीबाजारात जाऊन गर्दी करण्यापेक्षा घराजवळ जे भाजीचे हातठेले येतात, त्यांच्याकडून भाजी घ्यावी आणि कोरोनाचा धोका टाळावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले. एपीएमसीत येणाऱ्या भाजी विक्रेत्यांपैकी प्रत्येकाला दरदिवशी ॲन्टिबॉडी टेस्ट करण्याची सक्ती करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
----
होम डिलिव्हरीची व्यवस्था
कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही हॉटेल्स (इटिंग हाऊसेस), वाईन शॉप ओनर्स आणि स्टेट एक्साइजच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एक व्यक्ती एकावेळी किती दारूच्या बाटल्या (होम डिलिव्हरी)च्या नावाखाली नेऊ शकतो आणि किती विकू शकतो, त्यासंबधीचेही नियम ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे साठेबाजी अथवा अवैध विक्रीला जागा राहणार नसल्याचेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी आणि अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपस्थित होते.
----
शहराच्या सीमा सील
बस, ट्रेन, विमानसेवा सुरू असून, त्यातून बाहेर जाण्यास किंवा शहरात येण्यास मनाई नाहीच. मात्र, सहज नागपूरचा चक्कर मारून येऊ, असे म्हणत कुणी आजूबाजूच्या गावातील मंडळी नागपुरात येणार असेल तर पोलीस तसे होऊ देणार नाही. शहराच्या आठही सीमा सील केल्या जाणार असून, या सीमा तसेच ९९ अन्य अशा एकूण १०७ ठिकाणी रोज दिवसा नाकेबंदी लावली जाईल. तर रात्रीच्या वेळी ७४ ठिकाणी नाकेबंदी राहील. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन याप्रमाणे ९९ वाहने शहरात गस्त करतील. लॉकडाऊनच्या बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या दोन कंपन्या, आरसीपी सहा पथके, ५०० होमगार्डसह एकूण २५०० पोलीस तैनात राहणार आहेत.
----