अन् जगण्याचे बळ मिळाले
By Admin | Updated: November 8, 2015 03:09 IST2015-11-08T03:09:40+5:302015-11-08T03:09:40+5:30
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेली बच्चेकंपनी मेडिकलच्या कॅन्सर विभागात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये रमली.

अन् जगण्याचे बळ मिळाले
कॅन्सरबाधित मुलांनी साजरी केली ‘दिवाळी’ : मेडिकलच्या कॅन्सर विभागाचा स्तुत्य उपक्रम
नागपूर : कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेली बच्चेकंपनी मेडिकलच्या कॅन्सर विभागात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये रमली. या मुलांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण पेरताना मेडिकलच्या कॅन्सर विभागाने त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे फुलण्याची संधी दिली. विभागातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्याशी ही मुले खेळताना हळूवार भाविनक नातेही जुळले. खेळणीचे गिफ्ट घेत ‘डॉक्टर काका आपल्याला बरे करतील’, या उमेदीने बच्चे कंपनीला जगण्याचे बळ मिळाले.(प्रतिनिधी)
‘राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन’च्या निमित्ताने
मेडिकलच्या कॅन्सर विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजसेवक ज्ञानेश्वर रक्षक, विभाग प्रमुख डॉ. अशोक दिवाण आदी उपस्थित होते.
आत्मविश्वास निर्माण केला
चिमुकल्या वयात कॅन्सरचे दुखणे सोसत असताना नाउमेद होत असलेले मन, तोच तो औषधांचा दर्प, यातच त्यांचे हरवत चालले बालपण याच जाणिवेतून डॉ. कांबळे यांनी या मुलांना काही वेळांसाठी का होई ना वेगळ्या विश्वात नेले. त्यांच्यासोबत खेळले. खाऊ घातले, लहान मुलांचा चित्रपट दाखविला आणि जगण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. एकप्रकारे दिवाळीच त्यांच्या सोबत साजरी करण्यात आली.
कॅन्सरग्रस्त चिमुकल्यांना दत्तक घ्यावे
घरात आधीच दारिद्र्य त्यात चिमुकल्याला जडलेला कॅन्सर. उपचार करण्याची परिस्थिती नसताना ते संघर्ष करीत आहेत, पण दारिद्र्यासमोर अनेकांचे प्रयत्न थिटे पडत आहे. यावर उपाय म्हणून डॉ. कांबळे यांनी उपचारासाठी चिमुकल्यांना दत्तक घेण्याचे आवाहन केले आहे. असे झाल्यास अनेकांना नवजीवन मिळेल. चिमुकल्याला जगविण्याची पालकांची चिंता कमी होईल. अकाली होणारी ही कोवळी पानगळ थांबेल.
वेळेत उपचार घ्या
डॉ. अशोक दिवाण म्हणाले, रुग्ण म्हणतात कॅन्सरचा उपचार फार महागडा आहे, हा रोग बरा होणारा नाही. रुग्णाचा मृत्यूच होतो. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. जर वेळेत कॅन्सरचा उपचार केल्यास, स्वस्तात उपचार होतो आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्ण बरा होतो. गरज आहे फक्त या रोगाच्या संदर्भात सतर्कता पाळण्याची. त्याच्या लक्षणाच्या माहिती असण्याची. यावेळी त्यांनी कॅन्सरची लक्षणे, उपचार व उपाययोजनांची माहिती दिली.
संवेदनशीलता पुढे आली
मेडिकलच्या कॅन्सर विभागात उपचार घेणाऱ्यांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय मुलांची संख्या मोठी आहे. मेडिकल प्रशासन आपल्याकडून या मुलांना जेवढी मदत करता येईल, तेवढी करीत आहे, परंतु अनेक ठिकाणी त्यांची ही मदतही दुबळी पडत असल्याने, विभागाने शहरातील प्रतिष्ठित संस्था आणि दानदात्यांना आवाहन केले होते. त्यानुसार काहींनी मदत केली. ही मदत त्यांना लागणारी औषध, खेळणी, भेट वस्तू, खाद्य पदार्थांची होती. समाजाची ही संवेदनशीलता पाहून या भयंकर आजाराने नाउमेद झालेल्यांना जगण्याचे बळ मिळाले.