लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणासाठी थेट बँक खात्यात मिळणारे (डीबीटी) अनुदान तीन महिन्यांपासून थकल्याने आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विदर्भातील विविध शहरातील वसतिगृहात राहणारे २ हजारांच्यावर आदिवासी विद्यार्थी सोमवारी नागपुरात धडकले. या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर रात्रीपर्यंत ठिय्या आंदोलन केले.
सोमवारी दिवसभरापासून या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. राज्य सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करीत त्यांनी भोजनासाठी मिळणारे डीबीटी ताबडतोब देण्याची मागणी लावून धरली. विशेष म्हणजे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था बंद करून त्याऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे अनुदान नियमित मिळत नसल्याने डीबीटी योजना बंद करून पूर्ववत व्यवस्था ठेवण्याची मागणी करीत आंदोलन केले होते.
मात्र सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि डीबीटी अनुदान वाढविण्याचा जीआर काढून विद्यार्थ्यांना शांत केले. मात्र वाढीव अनुदानाचा पैसा अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. त्यामुळे हा असंतोष आणखी वाढत गेला. तीन महिन्यांपासून भोजनाचे पैसे न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. सोमवारी विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांनी नागपुरात धडक देत आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. येथे दिवसभर ठिय्या मांडला. विभागाच्या आयुक्त आरुषी सिंह यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या आश्वासनाने समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन रात्रीपर्यंत सुरू होते. आता भोजनाचे पैसे ताबडतोब जमा करावे व त्यानंतर डीबीटी योजना बंद करून वसतिगृहातच पूर्वीप्रमाणे भोजन व्यवस्था सुरू करावी, तसेच वसतिगृहात इतर सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे.