है तैयार हम !

By Admin | Updated: October 14, 2014 01:01 IST2014-10-14T01:01:19+5:302014-10-14T01:01:19+5:30

भयमुक्त वातावरणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडावे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त तयारी केली आहे. शहरातील वस्त्यावस्त्यात पोलिसांची गस्त सुरू असताना ग्रामीण

We are ready! | है तैयार हम !

है तैयार हम !

शहर आणि ग्रामीण पोलिसही सज्ज : निमलष्करी दल मदतीला
नागपूर : भयमुक्त वातावरणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडावे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त तयारी केली आहे. शहरातील वस्त्यावस्त्यात पोलिसांची गस्त सुरू असताना ग्रामीण पोलिसांनी गुंड, दारू, शस्त्र आणि रोकड पकडण्यासाठी रस्त्यारस्त्यावर फिल्डिंग लावली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहे. मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवून, धाक दाखवून मते मिळवण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे कुठे पैसे, कुठे कपडे, कुठे भेटवस्तू तर कुठे दारू वाटली जात असल्याची चर्चा आहे. या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी धावपळ चालवली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात हॉटेल, झोपडपट्ट्यात सर्चिंग सुरू आहे. चौकाचौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे.
एक हजार पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण चार हजारावर पोलीस कर्मचारी मतदानाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस अकादमीतूनही पीएसआय बंदोबस्ताला बोलवून घेण्यात आले आहे. आयटीबीटी आणि सीआयएसएफ तसेच राज्य राखीव दलासह निमलष्करी दलाच्या सात तुकड्या बंदोबस्तासाठी शहर पोलिसांनी बोलविल्या आहेत. मतदानाच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यासाठी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी आज दिवसभर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. (प्रतिनिधी)
ग्रामीण पोलिसही सज्ज
ग्रामीण पोलिसांनीही जबरदस्त तयारी केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी विधानसभा निवडणुकीअनुषंगाने बंदोबस्ताचे चांगले नियोजन केले आहे. १५० पोलीस अधिकारी आणि २०० कर्मचारी तसेच ६२७ होमगार्डच्या मदतीने डॉ. आरती सिंह यांनी मतदानाच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्र, सीआयडी, क्राईम पूणे येथील पोलीस अधिकारी, राज्य व केंद्रीय राखीव दल आणि तामिळनाडू तसेच तेलंगणा येथून निमलष्करी दलाच्या एकूण पाच तुकड्या बोलवून डॉ. सिंह यांनी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणावर गुंडांची धरपकड सुरू आहे. ठिकठिकाणी दारूचा साठा पकडण्यात आला आहे. परप्रांतातून गुंड, बोगस मतदार, शस्त्रसाठा किंवा दारू आणली जाऊ नये म्हणून त्यांनी नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या परप्रांताच्या सीमा सील केल्या आहेत. १८ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यतील गुंडांवर पोलिसांची तीक्ष्ण नजर आहे. वाहनांची आणि संशयित व्यक्तीचीही कसून तपासणी केली जात आहे.

Web Title: We are ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.