‘मेट्रोरिजन’साठी वेणाचे पाणी
By Admin | Updated: July 5, 2015 02:59 IST2015-07-05T02:59:51+5:302015-07-05T02:59:51+5:30
कन्हान जलविद्युत प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या नऊ टीएमसी पाण्यातून नागपूर शहर व मेट्रोरिजनला पाणीपुरवठा करण्याची ...

‘मेट्रोरिजन’साठी वेणाचे पाणी
नागपूर : कन्हान जलविद्युत प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या नऊ टीएमसी पाण्यातून नागपूर शहर व मेट्रोरिजनला पाणीपुरवठा करण्याची योजना जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे. हे पाणी जीवनी खापा येथील प्रस्तावित उर्ध्व प्रकल्पात सोडण्यात येईल. येथून ते पाईपलाईनव्दारे अमरावती मार्गावरील वेणा जलाशयात आणले जाणार आहे. यासाठी या प्रकल्पाची उंची वाढवावी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन असून ८ जुलैच्या स्थायी समितीच्या बैठकीत तो मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
मनपाला या सर्वेक्षणावर ७४ लाखांचा खर्च करावा लागणार आहे. ६ जून २०१२ च्या स्थायी समितीच्या बैठकीत जीवनी खापा प्रकल्पात नागपूर शहर व मेट्रोरिजनसाठी पाणी आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
या प्रकल्पाव्दारे दररोज ७०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. परंतु यासाठी वेणा जलाशयाच्या पाणीसाठवण क्षमतेत वाढ करण्यासाठी या प्रकल्याची उंची वाढविण्याची गरज आहे. हा प्रस्ताव तयार करताना प्र्रकल्पाचा सर्वे करण्याची गरज आहे. प्रकल्पावर होणाऱ्या खर्चाला मनपाची मंजुरी घेतल्यानंतर सिंचन व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण विभागातर्फे हा खर्च केला जाणार आहे.
वेणा प्रकल्पातील जलसंचय वाढल्याने बुडित क्षेत्रात वाढ होणार आहे. बुडित क्षेत्राच्या सर्वेसाठी ९ लाख, खड्डे व छिद्र, माती परीक्षण यावर ४० लाख, मध्यप्रदेशची सीमा ते वेणा प्रकल्पापर्यत पाणी आणण्यासाठीच्या सर्वेवर १८ लाख तसेच इतर कामावर ७ लाखाचा खर्च होण्याचा अंदाज आहे. सर्वे नंतर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.(प्रतिनिधी)
अंत्यसंस्कारासाठी पैसे मोजावे लागणार
शहरातील दहनघाटावर अंतिम संस्कारासाठी लाकडाचा मोफत पुरवठा करून मनपाने आदर्श निर्माण केला होता. यामुळे गरीब लोकांना दिलासा मिळत होता. परंतु आता दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी पैसे मोजवे लागणार आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना ५०० रुपये भरावे लागतील. परंतु यासाठी त्यांना नगरसेवकाचे पत्र आणावे लागेल. इतरांना अंतिम संस्कारासाठी निविदा दरानुसार लाकडासाठी पैसे मोजावे लागणार आहे. डिझेल, गॅसचा वापर केल्यास २०० रुपये द्यावे लागणार आहे. जुन्या कंत्राटदाराचा करार संपला असल्याने पुढील दोन वर्षासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. दहनघाटावर वर्षाला ५४०० टन लाकडाची गरज भासते. यावर ३.०५ कोटी खर्च होतो. एका अंतिम संस्कारासाठी ३०० किलो लाकूड व १० किलो गोवऱ्या लागतात. दहनघाटाचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे.