पाणी संपले, वर्हाडी तापले
By Admin | Updated: May 31, 2014 01:01 IST2014-05-31T01:01:34+5:302014-05-31T01:01:34+5:30
एखादे मंगल कार्यालय विवाह समारंभासाठी किरायाने घेतल्यावर तेथे किमान आवश्यक सुविधा असाव्यात, ही सामान्यत: अपेक्षा असते. पण पिण्याच्या पाण्यासारखी अत्यावश्यक बाब मंगल कार्यालयात नसली

पाणी संपले, वर्हाडी तापले
कृष्णा मंगल कार्यालयात गोंधळ : वेळेवर टँकरही आला नाही
नागपूर : एखादे मंगल कार्यालय विवाह समारंभासाठी किरायाने घेतल्यावर तेथे किमान आवश्यक सुविधा असाव्यात, ही सामान्यत: अपेक्षा असते. पण पिण्याच्या पाण्यासारखी अत्यावश्यक बाब मंगल कार्यालयात नसली तर वर्हाड्यांचे, लहान मुलांचे काय हाल होतात, याचा प्रत्यय आज आला. अचानक दुपारी १ वाजताच्या सुमारास मंगल कार्यालयातले पाणी संपले आणि विवाह समारंभाला उपस्थित लोकांचे हाल झाले. पाण्याअभावी विवाहाचे विधी थांबवावे लागले. वधुपक्षाकडील लोकांनी वरपक्षाकडून बोलणी खावी लागली आणि मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे काही काळ प्रचंड तणाव मंगल कार्यालयात निर्माण झाला.
भगवान वारजुरकर यांच्या मुलीचा विवाह समारंभ आज कृष्णा मंगल कार्यालय, हसनबाग रोड, भांडे प्लॉट चौकाजवळ पार पडला. मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाने सांगितल्याप्रमाणे पूर्ण किराया देण्यात आला. त्यात पिण्याच्या पाण्याची सोय करणे मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाचे काम होते. विवाह सोहळ्याला प्रारंभ झाला तोपर्यंंंत सारेच सुरळीत होते. त्यानंतर भोजनाला प्रारंभ झाला आणि उपस्थितांना पिण्याच्या पाणीच मिळेनासे झाले. संपूर्ण मंगल कार्यालयात पाण्याचा ठणठणाट होता. पाण्याची कुठलीच पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या वर्हाड्यांनी अन्नाचे ताट ठेवून पाणी मिळविण्यासाठी धडपड सुरु केली. भोजन करताना अन्नाने भरलेला हात धुण्यासाठीही दोन थेंबदेखील पाणी मंगल कार्यालयात उपलब्ध नव्हते. त्यामुळे हात भरलेल्या अवस्थेत वर्हाडी पाण्याचे पाऊच विकत घेण्यासाठी उन्हात रस्त्यावर आले. प्लेट धुण्यासाठीही पाणी नसल्याने काही काळ भोजन आणि विवाह समारंभाचे विधी अपरिहार्यपणे थांबबावे लागले. त्यात वधुपक्षाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यावर त्यांनी टँकर बोलाविला असल्याचे सांगितले. पण मधल्या दोन तासाच्या काळात सारेच ठप्प झाले. अनेक पाहुण्यांनी या असुविधेमुळे काढता पाय घेतला. कुलरमधले पाणीही संपले असल्याने गर्मीने लोक हैराण झाले. येथे प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
याप्रसंगी मुलीचे काका राजेश वारजुरकर म्हणाले, संपूर्ण किराया आधी दिल्यावरही गाद्यांच्या चादरी, कुलर आणि भोजनाचे सभागृह हळदीच्या भोजनासाठी व्यवस्थापनाने उपलब्ध करुन दिले नाही. पाणी नसल्याचे सांगितल्यावरही व्यवस्थापनाने टँकर बोलाविला असल्याचेच उत्तर दिले. अखेर पैसे खर्च करुन आम्हाला स्वतंत्रपणे टँकर बोलवावा लागला. अखेरपर्यंंंत मंगल कार्यालयाचा टँकर आलाच नाही.
पाणी नसल्याने टँकर येईपर्यंंंत पाण्याचे पाऊच आणि बाटल्या विकत आणून वर्हाड्यांना द्याव्या लागल्या. यात प्रचंड मनस्ताप झाला, असे ते म्हणाले.