नागपूर जिल्ह्यात ४९ गावांचे पाणी दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 16:03 IST2020-12-15T16:03:35+5:302020-12-15T16:03:57+5:30
water Nagpur News नागपूर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून नोव्हेंबर महिन्यात तपासण्यात आलेल्या ६१० पाण्याच्या नमुन्यांपैकी ४९ पाणी नमुने दूषित आढळून आले आहे.

नागपूर जिल्ह्यात ४९ गावांचे पाणी दूषित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून नोव्हेंबर महिन्यात तपासण्यात आलेल्या ६१० पाण्याच्या नमुन्यांपैकी ४९ पाणी नमुने दूषित आढळून आले आहे. मागील तपासणीपेक्षा या तपासणीत दूषित प्रमाण कमी झाले असले तरी, या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून येणाऱ्या पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. ही तपासणी प्रत्येक महिन्यामध्ये केली जाते. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावात जनजागृती केली जाते. तसेच संबंधित ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र, ग्रामीण पातळीवरील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६१० पाणीनमुने अनुजीव तपासणीकरिता पाठविण्यात आले. त्या पाणीनमुन्यांपैकी ४९ पाणीनमुने दूषित आढळून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आदी आजारांच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यातच आता पुन्हा दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार बळावत आहेत. तपासलेल्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक गावे रामटेक व कामठी तालुक्यातील आहेत.