लोकसभा निवडणुकीत ‘मनी पॉवर’वर ‘वॉच’; मागील निवडणुकांत आल्या होत्या दोन हजारांहून अधिक तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 04:16 IST2019-03-14T04:16:16+5:302019-03-14T04:16:32+5:30
२४ कोटींहून अधिक रक्कम झाली होती जप्त

लोकसभा निवडणुकीत ‘मनी पॉवर’वर ‘वॉच’; मागील निवडणुकांत आल्या होत्या दोन हजारांहून अधिक तक्रारी
- योगेश पांडे
नागपूर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ‘मनी पॉवर’चा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला अशाप्रकारचे आरोप मोठ्या प्रमाणावर झाले. यंदा निवडणूक आयोगाने आर्थिक स्वरूपाच्या आचारसंहिता भंगाचे गुन्हे तसेच ‘मनी पॉवर’वर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. २०१४ मध्ये आचारसंहितेच्या काळात आचारसंहिता भंगाचे दोन हजारांहून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले होते. तर राज्य निवडणूक आयोगाकडून संपूर्ण राज्यात २४ कोटींहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आली होती.
२०१४ साली लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता ५ मार्चपासून सुरू झाली होती. निवडणूक कालावधीत काळ्या पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता पाहता निवडणूक आयोगाने कंबर कसली होती. आर्थिक गुप्तचर यंत्रणादेखील सतर्क झाल्या होत्या. आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्र राज्यात आर्थिक स्वरूपाच्या २,०७७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या काळात पोलिसांनी निरनिराळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाया केल्या होत्या. यात २४ कोटी ३४ लाख १५ हजार २३९ रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती.
बेकायदेशीर रक्कम आयकरकडे जमा
जप्त केलेली २ कोटी ७० लाख १४ हजार १८५ रुपयांची रक्कम कायदेशीर असल्यामुळे संबंधित व्यक्तींनी ती परत करण्यात आली. परंतु उरलेल्या २१ कोटी ६४ लाख १ हजार ५४ रुपयांच्या रकमेसंदर्भात दावा करण्यास कुणीही समोर आले नव्हते. परिणामी ही रक्कम बेकायदेशीर असल्याचा संशय आल्यामुळे ही रक्कम आयकर विभागाकडे जमा करण्यात आली होती.