वासनकरने २५ हजार धनादेशांचे केले काय ?

By Admin | Updated: August 9, 2014 02:25 IST2014-08-09T02:25:36+5:302014-08-09T02:25:36+5:30

वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा प्रबंध संचालक आरोपी प्रशांत वासनकर याने गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी बँकांमधून घेतलेल्या २५ हजार १०० धनादेशांचे काय झाले,...

Wasanakar did 25,000 checks? | वासनकरने २५ हजार धनादेशांचे केले काय ?

वासनकरने २५ हजार धनादेशांचे केले काय ?

नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा प्रबंध संचालक आरोपी प्रशांत वासनकर याने गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी बँकांमधून घेतलेल्या २५ हजार १०० धनादेशांचे काय झाले, याबाबतच्या तपासासाठी सरकार पक्षाने केलेली आरोपींच्या दोन दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. मुळे यांच्या न्यायालयाने नामंजूर केली. या आरोपींना २१ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्यांची मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी करण्यात आली.
प्रशांत वासनकर आणि अभिजित चौधरी यांच्या पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपल्याने शुक्रवारी त्यांना दोन दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयाला असे सांगण्यात आले की, वासनकरने इंडियन ओव्हरसिज बँकेतून १२ आॅक्टोबर २०१० ते १८ फेब्रुवारी २०१४ या काळात २४ हजार ९५० आणि धरमपेठ येथील दी श्यामराव विठ्ठल को-आॅपरेटिव्ह बँकेतून १५० धनादेश प्राप्त केले होते. हे धनादेश गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींचा परतावा देण्यासाठी वापरल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र हे धनादेश ठेवी परताव्यासाठी वापरल्याचे बँकांच्या खाते उताऱ्यात आढळून येत नाही. या धनादेशाद्वारे आरोपीने किती रोख रकमेची उलाढाल केली याबाबत सविस्तर तपास करणे आहे. आतापर्यंत ११९ गुंतवणूकदारांकडून तक्रारी नोंदवण्यात आलेल्या असून फसवणुकीची रक्कम २९ कोटी ३७ लाख ४४ हजार २७० रुपये एवढी झाली आहे. याबाबत आरोपींकडे सखोल तपास करून रोखीने स्वीकारलेल्या रकमा कोठे ठेवल्या याचा शोध घेऊन हस्तगत करणे आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०१३ या दरम्यान गुंतवणूकदारांनी आपल्या देय रकमा परत मागितल्या होत्या. त्यांना रकमा न देता अविनाश भुते, अनिल सावरकर यासारख्या खासगी व्यक्ती, कंपन्या, सहआरोपी, सहकारी बँका, खासगी अकादमी, मेडिकल ट्रस्ट यांना देऊन गुंतवणूकदारांच्या ठेवीचांच मोठा अपहार करण्यात आला. या सर्वांना या रकमा देण्याचा उद्देश काय याबाबत तपास करणे आवश्यक आहे.
गुंतवणूकदारांच्या माहितीनुसार सुजीत मुझुमदार तसेच इतरांचे कंपनी एजंट म्हणून नाव समोर येत आहे. आरोपी याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.वासनकर वेल्थ आणि वासनकर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी २००८ मध्ये स्थापन करण्यात आली होती. या कंपनीचा आधार घेऊन वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. अशक्य प्रकारच्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून या कंपन्यांच्या नावे मोठ्या प्रमाणावर ठेवी स्वीकारल्या. या संपूर्ण रकमा जप्त करणे आहे, असेही सरकार पक्षाकडून न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख, पीडित गुंतवणूकदारांच्या वतीने अ‍ॅड. बी. एम. करडे, फिर्यादी पाठक यांच्यावतीने अ‍ॅड. गजेंद्र सावजी , आरोपींच्यावतीने अ‍ॅड. एम. बी. नायडू, अ‍ॅड. श्याम देवाणी, अ‍ॅड. प्रकाश नायडू न्यायालयात उपस्थित झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Wasanakar did 25,000 checks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.