उपराजधानीतील ग्रीन फटाके खरोखर ‘ग्रीन’ होते काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 11:53 AM2019-11-02T11:53:52+5:302019-11-02T11:55:47+5:30

दिवाळीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झालेले फटाके खरोखरच ग्रीन होते का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Was the green fireworks in the Nagpur really 'green'? | उपराजधानीतील ग्रीन फटाके खरोखर ‘ग्रीन’ होते काय?

उपराजधानीतील ग्रीन फटाके खरोखर ‘ग्रीन’ होते काय?

googlenewsNext
ठळक मुद्देग्राहक आणि विक्रेत्यांमध्येही संभ्रमग्रीन व्हिजीलने व्यक्त केला संशय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायु आणि ध्वनिप्रदूषण होत असल्याने पर्यावरणपूरक ‘ग्रीन क्रॅकर्स’ ची संकल्पना पुढे आली. यावर्षी पहिल्यांदा दिवाळीत या फटाक्यांना मान्यता देण्यात आली. मात्र दिवाळीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झालेले फटाके खरोखरच ग्रीन होते का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: वायू व ध्वनिप्रदूषणात वाढ नोंदविण्यात आल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विक्री झालेल्या ग्रीन व सामान्य फटाक्यांचे कन्टेंट सारखेच असल्याने ग्रीन फटाके पर्यावरण पूरक कसे, हा संशोधनाचा विषय आहे.
दिवाळी आली की दरवर्षी फटाक्यांमुळे प्रदूषण पसरत असल्याची ओरड होत असते. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर-नीरी) ने फटाक्यांमुळे प्रदूषणाची समस्या लक्षात घेता एक्स्पोसिव्ह सेफ्टी आॅर्गनायझेशन, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या सहकार्याने ग्रीन फटाक्यांचा फॉर्म्युला तयार केला होता. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयानेही याला मान्यता देत देशातील काही फटाका उत्पादक कंपन्यांशी संपर्क करून ग्रीन फटाक्यांच्या निर्मितीला चालना दिली होती. मात्र देशात फटाक्यांची गरज लक्षात घेता, ग्रीन फटाक्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असेल काय, हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी लावली होती आणि मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी मार्चपर्यंत ही बंदी कायम होती. त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. शहरातील एका विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी होलसेल बाजारात फटाक्यांची उपलब्धता ५० टक्क्याने घसरली होती आणि विक्रीसाठी फटाके मिळविण्यात विक्रेत्यांना संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे बाजारात फटाक्यांचे भावही वधारले आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजील संस्थेने बाजारात केलेल्या सर्वेक्षणानुसार मोठ्या प्रमाणाम ग्रीन फटाक्यांच्या नावाने सामान्य फटाक्यांचीच विक्री झाल्याचा दावा केला. ग्रीन व्हिजीलचे कौस्तुभ चटर्जी यांनी सांगितले, सर्वोच्च न्यायालयाची बंदी मार्चपर्यंत लागू होती. दिवाळीमुळे देशात फटाक्यांची गरज लक्षात घेता, कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे उत्पादन शक्य नाही. दुसरीकडे सामान्य फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण यामुळे नियंत्रित केले जाईल आणि वातावरणात पसरणारे धुलीकण ३० टक्के कमी करता येईल, असा दावा करण्यात आला होता.
केवळ ३० टक्के प्रदूषण रोखणे शक्य असल्याने उर्वरीत ७० टक्केचा प्रश्न कायम राहतो व त्यामुळे या फटाक्यांना पर्यावरणपूरक कसे म्हणता येईल, असा सवाल चटर्जी यांनी उपस्थित केला.

कन्टेंट सारखे, फटाके वेगळे कसे?
कौस्तुभ चटर्जी यांनी सांगितले, ग्रीन व्हिजीलतर्फे बाजारात सर्वेक्षण केले असता ग्रीन फटाके व सामान्य फटाक्यांमधील कन्टेंट सारखेच असल्याचे आढळून आले. ग्रीनचा लोगो असलेल्या पॅकेट्सवर पोटॅशियम नायट्रेट, अ‍ॅल्युमिनियम, बेरियम नायट्रेट, डेक्स्ट्रीन, स्ट्रोन्टियम नायट्रेट हे रासायनिक कन्टेंट नमूद आहेत. सामान्य फटाक्यांमध्येही हेच कन्टेंट वापरण्यात येतात. फटाक्यांवरील क्युआर कोडबाबतही संभ्रम दिसून आला. त्यामुळे ग्रीन व सीएसआयआर-नीरी च्या लोगोचा गैरवापर करून ग्रीन फटाक्यांच्या नावाने सामान्य फटाक्यांची विक्री करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

न फोडणाऱ्यांनीही फोडले
वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा विचार करीत असंख्य लोक फटाक्यांपासून दूर गेले होते. मात्र ग्रीन फटाके पर्यावरणपूरक असल्याचा दावा केल्यानंतर त्यांनी पुन्हा फटाके फोडण्याचा आनंद घेतल्याचे दिसून आले. अनेकांनी ती भावना व्यक्तही केली. मात्र ग्रीन फटाके ग्रीन कसे, यावर ग्राहकांमध्ये संभ्रम होता. ग्रीन आणि सामान्य फटाके कसे ओळखावे हा संभ्रम विक्रेत्यांमध्येही होता.

पर्यावरणविषयक संशोधन संस्था म्हणून आम्ही ग्रीन फटाक्यांचा फॉर्म्युला दिला आहे. हे फटाके पर्यावरणाच्या दृष्टीने लाभदायक आहेत व यावर आम्ही समाधानी आहोत. मात्र त्यानुसार उत्पादन व बाजारातील विक्रीवर नियंत्रण आमच्या अधिकार क्षेत्रात नाही. संबंधित विभागाचा हा विषय आहे, त्याबाबत आपल्याला बोलता येणार नाही.
- डॉ. साधना रायलू, मुख्य वैज्ञानिक व ईएमडी विभाग प्रमुख

Web Title: Was the green fireworks in the Nagpur really 'green'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.