विदर्भात पुन्हा वादळी पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST2021-04-12T04:08:44+5:302021-04-12T04:08:44+5:30
नागपूर : हवामान विभागाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुन्हा पुढचे चार दिवस पावसाचा आणि वादळाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना आणि ...

विदर्भात पुन्हा वादळी पावसाचा इशारा
नागपूर : हवामान विभागाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुन्हा पुढचे चार दिवस पावसाचा आणि वादळाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना आणि फळबागायतदारांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१२ आणि १३ एप्रिल हे दोन दिवस विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी वादळाचे आणि पावसाचे असतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस येण्याचा अंदाज आहे. वादळाचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असेल. वादळासोबत पाऊस आणि विजांचा इशारा देण्यात आला असून हा पाऊस फळबागा आणि भाजीपाला पिकांसाठी नुकसानकारक राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दिवसात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १४ व १५ एप्रिललासुद्धा सर्वच जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तविण्यात आला आहे. ९ एप्रिलपासून विदर्भात पावसाचे वातावरण आहे. शनिवारी १० तारखेला झालेल्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील काही भागात शेतीचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
मागील २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ११.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात १०.४ मिमी तर यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात १ मिमी आणि नागपूर शहरामध्ये ०४ मिमी पावसाची नोंद आहे.
पावसामुळे नागपुरातील तापमान बरेच खालावले आहे. शहरात ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कालच्यापेक्षा २.७ अंश सेल्सिअसने तापमानात घट झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान खालावले असून सरासरी ३६ अंशावर आले आहे. यामुळे उन्हाची तीव्रता बरीच कमी झाली आहे.