नागपूर : गेल्या १५ पेक्षा अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेने सर्वसामान्यांची डाेकेदुखी वाढविली आहे. काही केल्या पारा खाली येण्यास तयार नाही. नागपूरसह काही भागांत दाेन दिवस ढगाळ वातावरणाने ४० अंशाच्या आसपास घटला हाेता, पण रविवारी पुन्हा पाऱ्याने उसळी घेतली. १.२ अंशाची वाढ हाेऊन ताे ४१.२ अंशावर पाेहोचला. अकाेल्यात ४३.९ अंशावर स्थिर असलेल्या तापमानाने नागरिकांना हैराण केले आहे. हवामान विभागाने पुन्हा दाेन दिवस १२ एप्रिलपर्यंत विदर्भात उष्ण लाटेचा इशारा दिला.
हवामान विभागाने पुढचे पाच दिवस पूर्व-पश्चिम राजस्थानसह हरियाणा, दिल्ली, पूर्व-पश्चिम उत्तर प्रदेश व पश्चिम मध्य प्रदेशात अतिउष्ण लहरींचा इशारा दिला आहे. त्याच्या प्रभावाने विदर्भाचेही तापमान वाढण्याची शक्यता आहे. दाेन दिवस नागपूर काहीसे ढगांनी आच्छादले हाेते. रविवारी वातावरण स्वच्छ झाले तसे पाऱ्याने उसळी घेतली.
इतर जिल्ह्यांमध्ये आज तापमानाचा चढता आलेख दिसला. वर्धा ४२.२ अंश, वाशिम ४२.५ अंश, अमरावती ४२.६ अंश, ब्रह्मपुरी ४२.१ अंश, तर गाेंदिया १ अंशाने वाढून ४१.२ अंशावर पाेहोचले. सध्या केवळ गडचिराेलीचे तापमान ४० अंशाच्या खाली आहे. इतर जिल्हे मात्र उष्णतेचा प्रकाेप शाेषत आहेत.
रात्रीच्या किमान तापमानामध्येही सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाची वाढ झाली आहे. अमरावती ५.६, तर यवतमाळ ५.३ अंशाने वाढले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा स्थिर राहण्याचा काळ हाेता. इथून पुढे पाऱ्यात वाढच हाेण्याची शक्यता व्यक्त केली आहे.