लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. पदाधिकारी व प्रशासन हतबल झाले आहे. उत्पन्नवाढीसाठी नवीन स्रोत शोधले जात आहेत. परंतु करवसुलीसाठी जोर न लावता आरोग्यासाठी सकाळ-संध्याकाळ उद्यानात फिरणाऱ्यांकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. शहरातील मनपाच्या ६९ उद्यानांचे खासगीकरण करून उद्यानांची जबाबदारी सामाजिक संस्थांकडे देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे उद्यानात फिरणाऱ्या नागरिकांना लवकरच दररोज १५ ते २५ रुपये आर्थिक भुर्दंड बसणार आहे. यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू आहे.
शहरात १७५ उद्याने आहेत. मनपाची १३४ उद्याने होती. काही महिन्यांपूर्वी नासुप्रची ४४ उद्याने मनपाकडे हस्तांतरित करण्यात आली. या उद्यानांचा विकास व देखभाल करण्यासाठी मनपा तिजोरीत पैसा नसल्याने गांधीबाग व ट्राफिक चिल्ड्रेन पार्कच्या धर्तीवर १५ मोठी व ५४ लहान उद्यानांची जबाबदारी खासगी संस्थांकडे सोपविली जाणार आहे. शहरातील बहुतांश उद्यानात आता ग्रीम जीम लावण्यात आले आहेत. त्यामुळे व्यायामासाठी ज्येष्ठ व लहान मुले, युवकांची संख्याही वाढली आहे. पण आता मनपाकडून उद्याने खासगी संस्थांना देणार असल्यामुळे उद्यानात येणाऱ्यांची संख्या काही दिवसांत कमी होणार आहे. या खासगी संस्थांकडून दररोज प्रती व्यक्ती ५ रुपये आणि दुचाकी वाहनांसाठी १० तर चारचाकी वाहनांसाठी २० रुपये शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती आहे.
नागरिकांचा विरोध
उद्यानात फिरण्यासाठी वाहनाने गेल्यास किमान १५ ते २५ रुपये शुल्क मोजावे लागेल. व्यायामाची साधने असल्याने
ज्येष्ठ नागरिक घराजवळच्या उद्यानात फिरतात, तसेच विरंगुळा म्हणून एकत्र बसतात. काही उद्यानांत ज्येष्ठ नागरिकांचे योगावर्ग सुरू आहेत शिवाय लहान मुलेही उद्यानात खेळण्यास येतात पण यासाठी शुल्क मोजणे सर्वांना शक्य होणार नाही. यामुळे मनपाच्या या निर्णयाला नागरिकांचा विरोध होत आहे.
...
गांधीबाग व चिल्ड्रेन ट्रॉफिक पार्कच्या धर्तीवर शहरातील मनपाची १५ मोठी आणि ५४ लहान उद्याने खासगी संस्थांना चालविण्यासाठी दिली जाणार आहे. याबाबतचा निर्णय मनपाने आधीच घेतला होता.
अमोल चोरपगार, उपायुक्त उद्यान, मनपा
.....
अशी आहेत उद्याने
झोन उद्यानांची संख्या
लक्ष्मीनगर ४१
धरमपेठ २१
हनुमाननगर २२
धंतोली १२
नेहरूनगर १६
गांधीबाग १२
सतरंजीपुरा ९
लकडगंज १०
आशीनगर २०
मंगळवारी १२