काेराेना संक्रमणाने राेखली वारकऱ्यांची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST2021-03-13T04:15:24+5:302021-03-13T04:15:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माेहपा : कळमेश्वर तालुक्यातील निळगाव (बाेरगाव) येथील वारकरी दरवर्षी आषाढ व फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षात वारीला सुरुवात ...

काेराेना संक्रमणाने राेखली वारकऱ्यांची वाट
लाेकमत न्यूज नेटवर्क
माेहपा : कळमेश्वर तालुक्यातील निळगाव (बाेरगाव) येथील वारकरी दरवर्षी आषाढ व फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षात वारीला सुरुवात करीत पायी पंढरपूरला जात आणि विठुरायाचे दर्शन घेऊन परत येत. या वारीला १३० वर्षांची परंपरा लाभली आहे. काेराेना संक्रमणाने या वारकऱ्यांची वाट राेखल्याने ही परंपरा मागील वर्षी पहिल्यांदा आणि यावर्षी दुसऱ्यांदा खंडित झाली आहे. त्यामुळे भाविकांचा हिरमाेड झाला आहे.
आषाढ महिन्यातील पंढरपूरची वारी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्या वारीमध्ये राज्यभरातील लाखाे भाविक सहभागी हाेतात. परंतु, श्रीक्षेत्र आदासा नजीकच्या निळगाव येथील वारी आषाढ व फाल्गुन या दाेन महिन्यामध्ये निघते. चंद्रकांत धाेटे, रा. निळगाव, ता. कळमेश्वर, हे या वारीचे संयाेजक आहेत. फाल्गुन महिन्यातील वारीला धुलिवंदनाच्या दिवशी सुरुवात केली जाते. पैठणच्या नाथ संस्थानकडून सन १८१५ मध्ये या वारीला दिंडी क्रमांक-४ म्हणून मान्यता मिळाली होती, अशी माहिती चंद्रकांत धाेटे यांनी दिली.
पंढरपूरच्या स्वामी नामदेव महाराजांचे शिष्य स्वामी मल्हारी महाराज यांच्या प्रेरणेने ही वारी सुरू झाल्याचे काही जाणकार वारकऱ्यांनी सांगितले. पहिली पिढी माधव महाराज धोटे, दुसरी निवृत्ती, भागवत व चंद्रभागा धोटे यानंतर आयोजकांच्या तिसऱ्या पिढीकडे अर्थात चंद्रभान धोटे यांच्याकडे आता वारीचे सारथ्य आहे. आतापर्यंत ३७ वेळा पायी वारी करणारे रंगारी (ता. सौंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) येथील रामचंद्र ठाकरे, बेरडी (ता. सौंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) येथील श्रावण राऊत, वारीचे चोपदार सोनपूर (आदासा) (ता. कळमेश्वर) येथील नारायण पडोळे यांच्यासह अनेकांचा यंदाही वारी निघणार नसल्याने पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. पायीवारीतील वारकऱ्यांची सेवा व आदरातिथ्य करणाऱ्यांच्या आनंदास यंदाही मुकल्याची भावना येथील मनोहर बोडखे, माधव चर्जन, डॉ. मुरलीधर चिमोटे यांनी व्यक्त केली.
...
वारीचा ६५० किमीचा प्रवास
निळगाव येथून निघालेली ही वारी धापेवाडा, पिपळा (किनखेडे), मोहपा, सवंद्री, कोहळी, डोरली (भिंगारे), काटोल, वरुड मार्गे पंढरपूरचा पायी प्रवास करते. वारीचा हा प्रवास ६५० किमीचा असून, भाविक हा प्रवास दाेन महिन्यात पूर्ण करतात. वारीच्या मुक्कामाच्या प्रत्येक गावातून किमान एकतरी वारकरी या वारीत सामील होताे. वारीत सहभागी होणाऱ्यांची संपूर्ण माहिती चोपदाराकडे असते. निळगावचे धोटे कुटुंबीय वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पत्र पाठवून किंवा फोन करून कळवत असल्याने वारीचे नियोजन सहसा चुकत नाही. पैठण येथे पोहोचल्यानंतर ही वारी नाथ महाराजांच्या वारीत विलीन होते.