शिष्यवृत्तीची प्रतीक्षा, वेतनाची कपात सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:07 IST2021-06-11T04:07:12+5:302021-06-11T04:07:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अगोदरच कोरोनाचा फटका बसला असताना खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये शासकीय हलगर्जीपणामुळे अडचणीत सापडली आहेत. अद्यापपर्यंत ...

शिष्यवृत्तीची प्रतीक्षा, वेतनाची कपात सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगोदरच कोरोनाचा फटका बसला असताना खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये शासकीय हलगर्जीपणामुळे अडचणीत सापडली आहेत. अद्यापपर्यंत २०२०-२१ ची शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने महाविद्यालयांचे व्यवस्थापन अडचणीत सापडले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन कपात सुरूच असून अनेक जणांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ऑनलाईन माध्यमातून नियमितपणे वर्ग सुरू असताना वेतनकपात कधीपर्यंत सुरू राहणार असा प्रश्न प्राध्यापकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
नवीन वर्षात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे नूतनीकरण ‘ऑनलाईन’ करावे लागते. दरवर्षी जून-जुलै महिन्यातच ‘महाडीबीटी’चे संकेतस्थळ खुले केले जाते. जानेवारी महिन्यात शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता व एप्रिल-मेमध्ये दुसरा हप्ता महाविद्यालयांना मिळायचा. मात्र यंदा फार उशीर झाला. २०२०-२१ च्या शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेसाठी ‘महाडीबीटी पोर्टल’ आठ महिने उशिराने सुरू झाले. फेब्रुवारीमध्ये संकेतस्थळ खुले झाले. सर्व प्रक्रिया झाल्यावरदेखील अद्यापपर्यंत शिष्यवृत्ती मिळालेली नाही. शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांनी वेतनासंदर्भात हात अखडता घेतला आहे. अनेक महाविद्यालयांनी मागील एप्रिल महिन्यापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. थकीत रक्कमदेखील मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचारी व शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
शिष्यवृत्ती मिळणार कधी ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ही रक्कम कधी जमा होईल याकडे महाविद्यालयांचे डोळे लागले आहे. परंतु ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गाची शिष्यवृत्ती कधी मिळणार हा प्रश्न कायमच आहे.
कोरोनामुळे विस्कटली आर्थिक घडी
नागपूर विभागात ४७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यातील अनेक महाविद्यालयांमध्ये वर्षभरापासून पगार कपात सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत तेथील बरेचसे शिक्षक व कर्मचारी बाधित झाले होते. त्यातील काहींच्या उपचारांवर लाखोंचा खर्च झाला. एकीकडे उपचारांचा खर्च व दुसरीकडे वेतन कपात यामुळे त्यांची आर्थिक घडीच विस्कटल्याचे चित्र आहे.
विद्यार्थीदेखील अडचणीत
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क तसेच अभ्यास साहित्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यापीठाने परीक्षा शुल्क एकही रुपयाने कमी केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा खर्च केला. मात्र त्यांनादेखील थकीत रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत आले आहेत.