धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:11+5:302021-05-23T04:08:11+5:30
मौदा : खरीप हंगामातील धानाच्या बोनसची मौदा तालुक्यातील शेतकरी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत. अशात लोकप्रतिनिधी गप्प असल्याने शेतकऱ्यामध्ये संभ्रम ...

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा
मौदा : खरीप हंगामातील धानाच्या बोनसची मौदा तालुक्यातील शेतकरी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत. अशात लोकप्रतिनिधी गप्प असल्याने शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १,८०० रुपये हमीभावाव्यतिरिक्त प्रति क्विंटल ७०० रुपयांचा बोनस जाहीर केला होता. त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २,५०० रुपये दिले जाणार होते. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची शासकीय खरेदी केंद्रावर विक्री केली होती. शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रामार्फत धान खरेदीमध्ये सुरू असलेल्या १,८०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हमीभावाची रक्कम मिळाली आहे. परंतु राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला ७०० रुपयांचा बोनस अद्यापही मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
--
धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा मुख्य नफा म्हणजे बोनसच आहे. परंतु सरकारकडून अजूनही बोनस वितरित न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस जमा करावा.
- रोशन मेश्राम, सदस्य, ग्रामपंचायत नेरला.