वेटर...झाला झेड.पी. मेंबर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:40 AM2020-01-10T10:40:02+5:302020-01-10T10:42:33+5:30

लोक पोटभर जेवले की टीप म्हणून मिळणारे दहा-वीस रुपये खिशात ठेवताना सुखावणारा ‘वेटर महेंद्र’ आता जिल्हा परिषद सदस्य झाला आहे.

Waiter became... Z.P. Member! | वेटर...झाला झेड.पी. मेंबर!

वेटर...झाला झेड.पी. मेंबर!

Next
ठळक मुद्देधापेवाड्याच्या महेंद्र डोंगरेंना ‘विठ्ठल’ पावला१६ वर्षांपासून करतात सावजी हॉटेलमध्ये कामशेतमजुरीसह बारमध्येही काम केले

कमलेश वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ये महेंद्रा..चपाती घे... अरे रस्सा घे...पाणी घे... ग्राहकांची अशी ऑर्डर धावपळ करीत प्रत्येक टेबलवर जाऊन घेणारा, लोक पोटभर जेवले की टीप म्हणून मिळणारे दहा-वीस रुपये खिशात ठेवताना सुखावणारा ‘वेटर महेंद्र’ आता जिल्हा परिषद सदस्य झाला आहे. कालपर्यंत धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील सावजी हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारे महेंद्र डोंगरे काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले आहेत. महेंद्र यांना विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या धापेवाड्याचा विठ्ठलच पावला आहे.
पत्नी आठवडी बाजारात चप्पल विकते
महेंद्र डोंगरे यांच्या आई वयोवृद्ध आहेत. मुलगी लिशा ४ थ्या वर्गात शिकते. दोन बहिणींचे लग्न झाले आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पत्नी प्रियंता या देखील दोन पैैसे कमविण्यासाठी धडपड करतात. त्या घरकाम सांभाळून आठवडी बाजारात चप्पलचे दुकान लावतात. रविवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी मोहपा, सावनेर, कळमेश्वर येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात जागा मिळेत तेथे बसून त्या चप्पल विक्री करतात. इतर दिवशी घरून विक्री करतात. या कामातून त्या दरमहा सुमारे ३ हजार रुपये कमवितात. आज त्यांचे पती जिल्हा परिषद सदस्य झाल्याचा आनंद त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यात पहायला मिळतो.
प्रचारात डोळ्यात पाणी
महेंद्र हे वेटरचे काम करीत असल्यामुळे आजूबाजूच्या सर्व गावांसाठी परिचित होेते. ते प्रचारासाठी गावांमध्ये हात जोडत जायचे तेव्हा लोक गरीब माणूस म्हणून जवळ घ्यायचे. भाषण देण्यासाठी उभे झाले की ‘भाऊ तुमच्या वेटरला तिकीट मिळालं’ असे सांगत त्यांचे डोळे भरून यायचे. ते डोळे पुसायचे आणि लोकांचा निर्धार पक्का व्हायचा.

महेंद्र डोंगरे यांचा जन्म धापेवाड्याचाच. घरी परिस्थिती बेताचीच. घरी शेती नाही. कुठला मोठा व्यवसायही नाही. जंगम मालमत्ता नाही. १२ वी पर्यंत कसेबसे शिक्षण घेतले. नंतर घरची जबाबदारी पेलण्यासाठी मिंळेल ते काम करण्यास सुरवात केली. ग्रामीण भागात रोजगार सहसा मिळत नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या शेतावर मजुरी सुरू केली. ४३ वर्षांचे असलेले डोंगरे यांनी १६ वर्षांपूर्वी तेथील एका सावजी हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यास सुरुवात केली. मध्यल्या काळात बारमध्येही काम केले. सध्या ते राजा सावजी भोजनालयात वेटर आहेत. दरमहा ९ हजार रुपये पगार मिळतो. त्यात घर चालवितात. महेंद्र मितभाषी व अत्यंत साधा माणूस. राहणीमानही साधे. निवडणुका म्हटल्या की सावजी हॉटेलमध्ये पार्ट्या अन् गप्पा रंगायच्या. महेंद्र त्या ऐकायचे. पण कधीतरी आपणही जिल्हा परिषद निवडणूक लढू असा विचारही त्यांनी स्वप्नात केला नव्हता. निवडणुकीची धामधूम सुरू झाली. धापेवाड्यात अनेक दावेदार समोर आले. राजकीय उलटफेर झाले अन् शेवटी वेटर असलेल्या महेंद्र डोंगरे यांना मंत्री सुनील केदार यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महेंद्र तर लढायलाही तयार नव्हते. पण शेवटी गावकरी, सहकाऱ्यांनी हिंमत दिली आणि ते उमेदवार झाले. धापेवाडा म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मूळगाव. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर हे देखील इथलेच. पण महेंद्र यांच्या नशिबी राजयोगच होता. २० वर्षात काँग्रेसने कधीही न जिंकलेली जागा त्यांनी तब्बल ३९४३ मतांनी जिंकली. धापेवाड्याचा विठ्ठलच पावला.

Web Title: Waiter became... Z.P. Member!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.