बिर्याणीच्या ऑर्डरला वेळ लागल्याने केला वेटरवर हल्ला; नागपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 19:37 IST2023-01-02T19:36:39+5:302023-01-02T19:37:26+5:30
Nagpur News बिर्याणीची ऑर्डर आणून देण्यास वेळ लागल्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहक तरुणांनी वेटरवर हल्ला केला. याशिवाय दुसऱ्यांदा पुन्हा येत वेटरला मारहाण करत हॉटेलमध्ये तोडफोड करत राडा केला.

बिर्याणीच्या ऑर्डरला वेळ लागल्याने केला वेटरवर हल्ला; नागपुरातील घटना
नागपूर : बिर्याणीची ऑर्डर आणून देण्यास वेळ लागल्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहक तरुणांनी वेटरवर हल्ला केला. याशिवाय दुसऱ्यांदा पुन्हा येत वेटरला मारहाण करत हॉटेलमध्ये तोडफोड करत राडा केला. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामेश्वरी चौकातील रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला.
सलमान सय्यद यांचे रामेश्वरी चौकात तवक्कल रेस्टॉरंट आहे. रविवारी दुपारी तीन तरुण जेवायला आले होते व त्यांनी बिर्याणीची ऑर्डर दिली. बिर्याणी बनवायला थोडा वेळ लागला व ती घेऊन आशिक नावाचा वेटर टेबलवर घेऊन गेला. ऑर्डरला वेळ का लागला असे म्हणत तिघांनी त्याला शिवीगाळ केली व एक झापड मारून ते तेथून निघून गेले. ते परत येणार नसल्याचा समज झाल्याने रेस्टॉरंटमधील सर्वजण नियमित कामाला लागले.
मात्र तासाभरातच जिनेश उफाळे व त्याच्यासोबत सहा ते सात मुले आली. त्यांनी आत शिरत थेट तोडफोड करण्यास सुरुवात केली व आशिकला मारहाण केली. एकाने आशिकच्या पाठीवर खुर्ची मारत मालकालादेखील मारहाण सुरू केली. सर्वजण जीव वाचवत बाहेर पळाले. त्यानंतर आरोपी फरार झाले. सलमान यांनी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवून शोध सुरू आहे.