रोजंदारी कर्मचारी ते कुलसचिव!
By Admin | Updated: May 23, 2015 02:43 IST2015-05-23T02:43:21+5:302015-05-23T02:43:21+5:30
रोजंदारी कर्मचारी म्हणून झालेली सुरुवात, कुठलाही ‘गॉडफादर’ नसल्यामुळे काम व गुणवत्तेवरच दिलेला भर, टप्प्याटप्प्याला आलेला संघर्ष अन् प्रत्येकवेळी कष्टातून मिळविलेले यश !

रोजंदारी कर्मचारी ते कुलसचिव!
पूरण मेश्राम यांची प्रेरणावाट : गुणवत्तेच्या आधारावर केली अडचणींवर मात
योगेश पांडे नागपूर
रोजंदारी कर्मचारी म्हणून झालेली सुरुवात, कुठलाही ‘गॉडफादर’ नसल्यामुळे काम व गुणवत्तेवरच दिलेला भर, टप्प्याटप्प्याला आलेला संघर्ष अन् प्रत्येकवेळी कष्टातून मिळविलेले यश ! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नवे कुलसचिव पूरण मेश्राम यांचा हा थक्क करणारा प्रवास नवीन पिढीला प्रेरणावाट दाखविणारा आहे.
पूरण मेश्राम हे नागपूर विद्यापीठाशी विद्यार्थीदशेपासूनच जुळले आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असूनदेखील विद्यार्थ्यांच्या समस्यांना सोडविण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत. नागपूरच्या महाविद्यालयीन वर्तुळातील उत्कृष्ट वक्तृत्वपटू म्हणूनदेखील त्यांची ओळख होती. नागपूर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सांस्कृतिक सचिव झाल्यानंतर सिनेटमध्येदेखील ते वर्षभर होते. दलित चळवळीमध्येदेखील ते अग्रेसर होते.त्या काळात माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांनी ८० ते ९० कर्मचाऱ्यांना रोजंदारीवर विद्यापीठात घेतले व पूरण मेश्राम यांची विद्यापीठात ‘एन्ट्री’ झाली.
सुमारे ७ वर्षे ते रोजंदारी कर्मचारी म्हणून कार्यरत होते व दिलेली सर्व कामे त्यांनी चोखपणे बजावली. त्यानंतर ते विद्यापीठात ‘फिक्स-पे’वर आले व काही कालावधीत लिपीक ग्रेडवर आले. सचोटीने काम करत असताना त्यांनी पत्रकारिता व वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षणदेखील पूर्ण केले. १९९२ ते ९४ या कालावधीत ते प्रकाशन अधिकारी म्हणून कामावर होते. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
सहायक कुलसचिव, उपकुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी असे करत अखेर ते विद्यापीठाचे कुलसचिव झाले.
पूरण मेश्राम हे विविध विद्यापीठांच्या समित्यांवर असून ते भारतीय विद्यापीठांच्या वित्त संसाधनांच्या मुद्यावर संशोधन करत आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी धावून जाणारा अधिकारी
विद्यार्थीदशेपासूनच पूरण मेश्राम हे समाजकारणाशी जुळले होते. त्यामुळे विद्यापीठात काम करतानादेखील ते सामाजिक अधिकारी म्हणून प्रसिद्ध झाले. कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय झाला तर ते नेहमी त्याच्यासाठी धावून जातात. विद्यापीठात मागासवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागांचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. २०१२ सालापासून ते महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज् आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष आहेत.
दांडगा जनसंपर्क
पूरण मेश्राम यांच्याकडे केवळ प्रशासकीय कौशल्यच नसून त्यांचा जनसंपर्कदेखील दांडगा आहे. शुक्रवारी त्यांची कुलसचिवपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी पाहूनच त्यांचा जनसंपर्क व कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी असलेली आपुलकी दिसून येत होती. प्रखर बुद्धिमत्ता, प्रशासकीय कौशल्य अन् विद्यापीठाची खडान्खडा माहिती यामुळे ते या पदाला योग्य न्याय देऊ शकतील अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू होती.