व्योमिका-सोफिया निर्माण होतात, पण कुठे हरवतात?

By शुभांगी काळमेघ | Updated: May 12, 2025 11:45 IST2025-05-12T11:41:04+5:302025-05-12T11:45:15+5:30

Nagpur : ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेने आणि त्याच्या प्रेस कॉन्फरन्सने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले कारण विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेची माहिती दिली आणि भारतीय महिलांची ताकद पुन्हा एकदा जगासमोर आली. पण हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक मुलीला सहजगत्या मिळतो का? दुर्दैवाने नाही.

Vyomika-Sophia are created, but where do they disappear? | व्योमिका-सोफिया निर्माण होतात, पण कुठे हरवतात?

Vyomika-Sophia are created, but where do they disappear?

शुभांगी काळमेघ 
नागपूर :
बारावीचा निकाल पुन्हा एकदा सांगून गेला की मुली हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत आणि प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करत आहेत. यंदाही मुलींनी मुलांपेक्षा ७.५७% अधिक निकाल लावला. राज्यभर हजारो मुलींनी मेहनतीचं फळ मिळवून, स्वप्नांना उंच झेप दिली. निकालानंतर मुलींच्या आनंदाचे, विजयाचं प्रतीक असलेल्या दृश्यांनी अनेकांची मनं जिंकली. 

हातात निकालपत्र, चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू आणि डोळ्यांत चमकणारी स्वप्नं... पण हे चित्र पुढे नेहमीच टिकतं का? याचं उत्तर मनाला चटका लावणारं आहे. कारण दहावी-बारावीपर्यंत यशस्वी ठरणाऱ्या अनेक मुली पुढील शैक्षणिक टप्प्यांवर आणि करिअरच्या वाटेवर मात्र कुठे तरी हरवतात.


आकडेवारी सांगते की भारतात महिलांचं श्रमशक्तीत योगदान केवळ २०-२५% आहे आणि दुर्दैवाने हा आकडा वाढत नाही, मुलींची शैक्षणिक प्रगती बघूनही समाजाची मानसिकता अजूनही "शिकवू या, पण मर्यादेतच" अशीच आहे. अनेक वेळा मुलींना शिकवलं जातं केवळ सुसंस्कारित, 'बायोडेटा योग्य' बनवण्यासाठी. शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं, पण करिअरच्या बाबतीत मात्र बंधनं वाढतात. "लग्न झालं की बघू", "इतकं शिकून काय करणार?" हे वाक्य अजूनही सामान्य आहेत. समाजाच्या नजरा, आर्थिक मर्यादा, आणि सुरक्षिततेच्या भीतीमुळे मुलींची स्वप्नं टप्प्याटप्प्याने लहान होऊ लागतात. अनेकदा त्या स्वप्नं पाहतात, पण त्यासाठी लढण्याची ताकद त्यांच्या हातून हिरावली जाते. काहींनी नोकरी केली तरी त्यात टिकून राहणं हे अजून एक मोठं आव्हान असतं. हे दुभंगलेलं वास्तव फार काही बोलून जातं. आजही अनेक मुलींना शिक्षणाच्या पलीकडे जाण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो, हेच वास्तव अस्वस्थ करतं. मात्र हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे. घरातून, समाजातून, आणि शासनाकडून पाठबळ मिळालं तर हे वास्तव बदलू शकतं. मुलींना केवळ शिकण्याचीच नाही, तर आपल्या स्वप्नांसाठी लढण्याचीही मोकळीक दिली पाहिजे. सुरक्षितता, संधी आणि समानतेचा आधार दिला, तर आजची 'बारावीतील टॉपर' उद्याची 'व्योमिका सिंग' किंवा 'सोफिया कुरैशी' बनू शकते.

Web Title: Vyomika-Sophia are created, but where do they disappear?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.