मतदान केंद्रालगत वीज कोसळून पोलीस ठार
By Admin | Updated: October 16, 2014 00:55 IST2014-10-16T00:55:55+5:302014-10-16T00:55:55+5:30
जोरदार पाऊस सुरू झाल्याने मतदारांसह पोलीस शिपायाने मतदानकेंद्राच्या परिसरात असलेल्या पानटपरीत आश्रय घेतला. दरम्यान, जोरात कडाडलेली वीज थेट या पानटपरीवर कोसळली.

मतदान केंद्रालगत वीज कोसळून पोलीस ठार
पारशिवनी : जोरदार पाऊस सुरू झाल्याने मतदारांसह पोलीस शिपायाने मतदानकेंद्राच्या परिसरात असलेल्या पानटपरीत आश्रय घेतला. दरम्यान, जोरात कडाडलेली वीज थेट या पानटपरीवर कोसळली. यात पोलीस शिपायाचा मृत्यू झाला तर, अन्य सात जण जखमी झाले. यात तिघे गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ही घटना रामटेक विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील आवळेघाट येथे बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
रवींद्र प्रभाकर मानकर (४०, रा. नागपूर, बक्कल क्रमांक-१२६२) असे मृत पोलीस शिपायाचे नाव असून, सुमित्रा रामचंद्र चंदनघरे (६०), संदीप मधुकर भोयर (२१), बंटी देवीदास राऊत (१२), कोमल शंकर ढोरे (२८), रूपेश लीलाधर चंदनकर (१४), दिनकर हैबत डुंबे (२४), देवीदास गुलाब राऊत (४०) सर्व रा. आवळेघाट, ता. पारशिवनी अशी जखमींची नावे आहेत. आवळेघाट या गावाचा चारगाव गटग्रामपंचायतमध्ये समावेश असून, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानकेंद्र देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)