१३ वर्षांपासून विठ्ठलनगरवासी तहानलेलेच ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:16 IST2021-02-20T04:16:23+5:302021-02-20T04:16:23+5:30

नागपूर : संत्रानगरी म्हणून नावलौकिक असलेल्या नागपूर शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. मेट्रो रेल्वे, आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय आदीसारख्या सुविधा नागपूरकरांना ...

Vitthalnagar residents have been thirsty for 13 years () | १३ वर्षांपासून विठ्ठलनगरवासी तहानलेलेच ()

१३ वर्षांपासून विठ्ठलनगरवासी तहानलेलेच ()

नागपूर : संत्रानगरी म्हणून नावलौकिक असलेल्या नागपूर शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. मेट्रो रेल्वे, आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय आदीसारख्या सुविधा नागपूरकरांना उपलब्ध होत आहेत. परंतु दुसरीकडे दक्षिण नागपुरातील विठ्ठलनगर १ मधील नागरिकांना मात्र मूलभूत समस्यांसाठी लढा द्यावा लागत आहे. येथील नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, महापालिकेने त्वरित नागरिकांची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

एकाच नळावरून शेकडो नागरिक भरतात पाणी

मागील १३ वर्षांपासून विठ्ठलनगर १ या भागात नळलाईन नाही. विठ्ठलनगर १ मध्ये एकच सार्वजनिक नळ आहे. या नळावरून वैष्णवीनगर, शेषनगर, सिद्धेश्वरी आदी भागातील नागरिक पाणी भरण्यासाठी येतात. त्यामुळे नळावर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळते. या भागात पाण्याच्या टाकीचे उद्घाटन झाले आहे. मात्र अद्याप नळलाईन सुरू झालेली नाही. नळलाईन सुरू झाल्यास नागरिक नळ कनेक्शन घेण्यासाठी तयार आहेत. परंतु अद्यापही नळलाईन सुरू करण्यात आलेली नाही. उन्हाळ्यात या भागातील विहिरी आटतात. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली भटकंती लक्षात घेऊन महानगरपालिकेने त्वरित या भागात नळलाईन सुरू करण्याची नागरिकांची मागणी आहे.

रस्त्यावर जागोजागी पडले आहेत खड्डे

विठ्ठलनगर १ या भागातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांना खड्डा दिसत नाही. त्यामुळे त्यांचे अपघात होतात. या भागातील सर्वच अंतर्गत रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे त्यांचे अपघात होतात. त्यामुळे या भागात डांबरीकरण करण्याची गरज आहे. यासोबत या भागातील कूपनलिकाही बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. बंद पडलेल्या कूपनलिका दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

सफाई कर्मचारी येतच नाहीत, रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी

परिसरात सफाई कर्मचारीच येत नसल्याची माहिती विठ्ठलनगर १ मधील नागरिकांनी दिली. सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे जागोजागी कचरा साचलेला दिसतो. यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेने या भागात नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. या भागात अनेक नागरिकांनी प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत. या प्लॉटवर कुणीच राहत नाही. रिकाम्या प्लॉटमध्ये नागरिक कचरा टाकतात. पावसाळ्यात या प्लॉटमध्ये पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे अशा प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

असामाजिक तत्त्वांचा उपद्रव

विठ्ठलनगर १ परिसरात बारी लॉन आहे. या लॉनजवळ असामाजिक तत्त्व गोळा होतात. हे असामाजिक तत्त्व येथे दारू पिणे, जुगार खेळणे आदी प्रकार करतात. त्यामुळे या भागातील नागरिकांना दहशतीत रस्त्यावरून चालावे लागत आहे. सायंकाळच्या सुमारास महिला जीव मुठीत घेऊन तेथून जातात. पोलिसांनाही हा प्रकार माहीत आहे. मात्र तरीसुद्धा पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे असामाजिक तत्त्वांचे फावत आहे. पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

नळलाईन सुरू करावी

‘नळलाईन नसल्यामुळे एकाच सार्वजनिक नळावरून शेकडो नागरिकांना पाणी भरावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून महानगरपालिकेने नळलाईन सुरू करण्याची गरज आहे.’

- प्रभू गौरीकर, नागरिक

सफाई कर्मचारी नियमित यावेत

‘सफाई कर्मचारी येतच नसल्यामुळे परिसरात कचरा पडून राहतो. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे महानगरपालिकेने नियमित सफाई कर्मचारी या भागात पाठविण्याची गरज आहे.’

- कल्पना मोटघरे, महिला

रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करावी

‘विठ्ठलनगर १ या भागात अनेक नागरिकांनी प्लॉट घेऊन ठेवले आहेत. या प्लॉटवर कचरा साचतो. तसेच पावसाळ्यात पाणी जमा होते. डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे या रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.’

- सुनिता वनकर, महिला

असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा

बारी लॉनजवळ असामाजिक तत्त्व गोळा होतात. रस्त्यावर मद्य प्राशन करणे, जुगार खेळण्याचे प्रकार ते करतात. त्यामुळे पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा.’

- विष्णू इरखंडे, नागरिक

स्वच्छतेकडे लक्ष पुरवावे

वैष्णोमातानगरात अनेक वर्षांपासून सफाई कर्मचारीच येत नाहीत. त्यामुळे कचरा साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. महानगरपालिकेने या भागात स्वच्छतेकडे लक्ष पुरवून नियमित सफाई कर्मचारी पाठवावेत.’

- नारायण फाळके, नागरिक

गडरलाईनची व्यवस्था करावी

- काही नागरिकांच्या घराजवळ गडरलाईन नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने सर्वांना गडरलाईन उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’

- संजय डहाके, नागरिक

..........

Web Title: Vitthalnagar residents have been thirsty for 13 years ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.