विठ्ठल भक्तांची मांदियाळी
By Admin | Updated: July 28, 2015 04:18 IST2015-07-28T04:18:49+5:302015-07-28T04:18:49+5:30
आषाढी एकादशी पर्वानिमित्त ठिकठिकाणी दिंडी व रथयात्रेचे आयोजन करून भाविकांनी विठुरायाचा गजर केला.

विठ्ठल भक्तांची मांदियाळी
आषाढी एकादशी : धापेवाडा व रामटेकमध्ये विठुरायाच्या नामाचा गजर
नागपूर : आषाढी एकादशी पर्वानिमित्त ठिकठिकाणी दिंडी व रथयात्रेचे आयोजन करून भाविकांनी विठुरायाचा गजर केला. कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात आषाढी उत्सवास सुरुवात झाली तसेच रामटेकमध्ये रथयात्रेचे जल्लोषात आयोजन करण्यात आले. ढोल-ताशाच्या गजरात विठ्ठल भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या उत्सवानिमित्त काटोल, कामठी येथील मंदिरात दिंडी व पूजन-आरती कार्यक्रमाचे आयोजन पार पडले.
कळमेश्वर
विदर्भाचे पंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी उसळली. पंढरपूरप्रमाणे येथील उत्सवास महत्त्व असल्याने अनेक भाविक येथे येतात. सोमवारी पहाटे ५ वाजता विठ्ठल-रूख्माईची पूजन, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिराचे पट भाविकांसाठी खुले करण्यात आले. दुपारी २ वाजता पांडुरंग बारापात्रे महाराजांचे कीर्तन पार पडले. विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
रामटेक
शहरातील भगतसिंग वॉर्ड येथील प्राचीन विठ्ठल मंदिरातून सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सायंकाळी ७.३० वाजता वाजत-गाजत रथयात्रा काढण्यात आली. नगर परिक्रमा करून रथयात्रा रात्री १० वाजताच्या सुमारास मंदिरात परत आली. या रथयात्रेने शहरात विठुरायाच्या नामाचा गजर केला. तसेच आठशे वर्षांची परंपरा असलेल्या स्वामी परमानंद मठातदेखील भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले.
विठ्ठल मंदिराचे सर्वेसर्वा कृष्णराव मैराळ यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. कृष्णरावांचे आजोबा रामभक्त होते. ते दररोज गडमंदिरात रामाच्या दर्शनाकरिता नित्यनेमाने जात. वार्धक्यामुळे त्यांना मंदिरात जाणे जमेनासे झाले. त्यावेळी रामाने त्यांच्या स्वप्नात येऊन विठ्ठल मंदिर स्थापन करण्यास सांगितले. तो विठ्ठल म्हणजेच मी आहे असा दृष्टांत दिला. या दृष्टांतानुसार विठ्ठल मंदिर उभारण्यात आले.
दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिरातून रथयात्रा काढली जाते. कृष्णराव मैराळांच्या निधनानंतर रथयात्रेची प्राचीन परंपरा मोडीत निघणार की काय अशी भीती निर्माण झाली होती, परंतु भगतसिंग वॉर्डाचे माजी नगरसेवक चंद्रशेखर भोयर, दिलीप बिसन, संजय भोयर आदींनी पुढाकार घेऊन रथयात्रा सुरू ठेवली. तीन मजली लाकडी रथ दोरीच्या साह्याने ओढण्यात येतो.
रथापुढे घोडा, बँड, टाळ दिंडी आणि भगव्या टोप्या परिधान केलेले भाविक सहभागी होतात. चंद्रशेखर भोयर, दिलीप बिसन, संजय भोयर, आनंदराव नेवरे, खरकसिंग, माकडे गुरुजी, श्रीराम माकडे, अभय ठाणेकर आदींचा रथयात्रेत समावेश होता. भगतसिंग वॉर्डातील विठ्ठल मंदिरातून रथयात्रेला सुरुवात झाली. गांधी चौक, अठरा भुजा गणेश मंदिर, रामतळी अशी परिक्रमा करून रथयात्रा रात्री १० वाजताच्या सुमारास मंदिरात परत आली. रथयात्रा परिक्रमा मार्गावर गृहिणींनी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. गावातील भाविकांनी मनोभावे रथाचे दर्शन घेतले. रथामध्ये विठ्ठल-रुख्माईच्या मूर्ती विराजमान केल्या होत्या.
काटोल
आषाढी एकादशीनिमित्त शहरात पालखीची पायी दिंडी यात्रा काढण्यात आली. विठ्ठलनामाच्या गजरात निघालेल्या दिंडीने काटोलनगरी दुमदुमली.
शहरातील ऐतिहासिक स्वयंभू विराजमान देवी सरस्वती माता मंदिर येथे पूजन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली. ही पायी दिंडी शहरातील मुख्य मार्गाने शनि चौक, चंडिका मंदिर, कृष्ण मंदिर, राऊतपुरा, पंचवटी येथे अनसूया माता मंदिर भ्रमण करून श्रीक्षेत्र अनसूया माता संस्थान पारडसिंगा येथे दिंडीचा समारोप करण्यात आला. दिंडी यात्रेदरम्यान ठिकठिकाणी सडासंर्माजन, रांगोळी व फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्वागत करण्यात आले.
दिंडीतील भाविकांसाठी जागोजागी फराळाचे वाटप करण्यात आले. अनसूया माता सत्संग मंडळातर्फे आयोजित या दिंडीमध्ये विठ्ठल बारई, पुरुषोत्तम भट, युवराज राऊत, धनराज शेरकर, मारोती तांबुस्कर, सुभाष कोठे, विश्वनाथ बागडे, नीलेश नानोटकर आदींचा सहभाग होता. विविध गावातील भजनमंडळ व महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
कामठी
स्थानिक दालओळी परिसरातील प्राचीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी पर्व उत्साहात साजरे करण्यात आले. सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष फकीरचंद गुरव यांच्या हस्ते पूजन व आरती करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगर परिषद उपाध्यक्ष रणजीत सफेलकर, प्रमोद मेठे, मंदिर कमिटीचे अध्यक्ष भोला तालेवार, संजय गटलेवार, नरेंद्र मूर्ती कायरवार, गिरीधारीलाल रायपरतीवार, नरसिंग तालेवार, बालाजी गंधेवार, राजेश काटरपवार, गीता मंथनवार, रजनी तालेवार, मीना कायरवार, शुभ्रमनी अडेपवार, सीमा मंथापूरवार आदी उपस्थित होते. यावेळी महिला भजन मंडळांनी भजन सादर केले. (प्रतिनिधींकडून)