लावणीसम्राज्ञीची व्यथा ‘विठाबाई’
By Admin | Updated: November 20, 2014 01:03 IST2014-11-20T01:03:59+5:302014-11-20T01:03:59+5:30
महाराष्ट्रातील शाहिरी लोकसंगीताला दीर्घकालीन पूर्व परंपरा असली आणि सामान्य जनमानसात लोकप्रियताही लाभली असली तरी तथाकथित उच्चभ्रू समाजात मात्र लोकसंगीताला अपवादानेच प्रतिष्ठा मिळाली आहे.

लावणीसम्राज्ञीची व्यथा ‘विठाबाई’
राज्य नाट्य महोत्सव : अंकुर मानव समाज उत्थान केंद्राचे सादरीकरण
नागपूर : महाराष्ट्रातील शाहिरी लोकसंगीताला दीर्घकालीन पूर्व परंपरा असली आणि सामान्य जनमानसात लोकप्रियताही लाभली असली तरी तथाकथित उच्चभ्रू समाजात मात्र लोकसंगीताला अपवादानेच प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यात तमाशाच्या फडातील लावणी नृत्यांगना आणि सहकलावंतांचे जीवन म्हणजे पाण्यावरची रेघच आहे. तमाशातील लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या लौकिक यश, कीर्ती आणि अलौकिक लोकप्रियेसह त्यांची संघर्षमय कथा साकारणारे नाट्य म्हणून संजय जीवने यांच्या ‘विठाबाई’ या नाटकाचा उल्लेख करावा लागेल. आज हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यात आले.
या नाटकाचे दिग्दर्शनही संजय जीवने यांनीच केले होते. रसिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे हे दमदार सादरीकरण होते. चाकोरीबाहेरचा विषय समर्थपणे साकारण्यात कलावंत कुठेही कमी पडले नाही. विठाबार्इंच्या वास्तविक जीवनाचा आलेख नेमकेपणाने उलगडून दाखविणाऱ्या वंदना जीवने यांचे आत्मकथन आणि लावणीसम्राज्ञीला साकारणारी सांची जीवने यांचे विशेष कौतुक करावे लागेल. विठा म्हणजेच नृत्य असे समीकरण असलेल्या या प्रतिभावान नृत्यांगनेला तमाशातील कलावंतच समजले गेले. तमाशावर पोट भरणाऱ्या सहकलावंतांसाठी भल्याबुऱ्या कुठल्याही परिस्थितीत न थकता पावलातील घुंगरू तुटेपर्यंत नाचणाऱ्या आणि आलेल्या संकटांशी धैर्याने सामना करणाऱ्या विठाबाई भारतीय जवानांचे मनोरंजन करण्यासाठीही गेल्या. नाटकातील प्रसंग, लावणी नृत्ये, अभिनय यामुळे सर्वांनीच कलावंतांना दाद दिली. यात सांची जीवने, वंदना जीवने, संजय जीवने, ललित गायकवाड, रोशन श्रीवास्तव, अभिजित मून, मिलिंद कोटंबे, भोजराज हाडके, हरीश गवई, संदीप मून, उज्ज्वल भगत, अनिकेत कांबळे, सदिच्छा जिलटे, लुंबिनी आवळे, गौरी सोनटक्के, रितीका बावणे, रुणाली कांबळे, जुई गडकरी, सायली तुपे, साक्षी शिरभैये यांनी भूमिका केली. संगीत सोना बहुरूपी यांचे होते.
संवादिनी श्रुती पांडवकर, हलगी अभिलाष बागडे आणि कांचन घाटोळे, गायन सोना बहुरूपी, भूषण जाधव आणि मोनिका भोयर यांनी केले. प्रकाशयोजना मिथून मित्रा, नेपथ्य संदीप हमदापूरकर, नाना मिसाळ, बाबा खिरेकर, प्रीती तुपे, मनीष पाटील, रोशन श्रीवास्तव यांचे होते. निर्मिती सुरेंद्र आवळे आणि निर्मिती सहायक मनोज रंगारी, प्रमोद कोटंबे, सायली तुपे, प्रणिता जांगळेकर, दामिनी आणि बानाई यांनी केले होते. (प्रतिनिधी)