जवानांच्या सन्मानासाठी त्याचे सायकलवर भारत भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:32 PM2019-09-27T22:32:09+5:302019-09-27T22:32:52+5:30

शहीद जवानांचा सन्मान. हा संदेश देत ध्येयवेडा माणूस सायकलने प्रवासाला निघाला आणि मजल दरमजल गाठत वाघा बॉर्डरपर्यंत ४००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे सायकलिस्ट दिलीप भरत मलिक ही होय.

Visit India on his bicycle to honor the jawans | जवानांच्या सन्मानासाठी त्याचे सायकलवर भारत भ्रमण

जवानांच्या सन्मानासाठी त्याचे सायकलवर भारत भ्रमण

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा सफाई कर्मचाऱ्याचे असेही ध्येय : २९ दिवसात ४००० किमीचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखाद्या ध्येयाने पछाडलेला माणूस ते पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. त्यानेही एक ध्येय मनात बाळगले होते. या मायभूमीच्या एकेका कानाकोपऱ्याला भेटायचे आणि तेही सायकलने प्रवास करून. या भटकंतीची संकल्पना होती, शहीद जवानांचा सन्मान. हा संदेश देत हा ध्येयवेडा माणूस सायकलने प्रवासाला निघाला आणि मजल दरमजल गाठत वाघा बॉर्डरपर्यंत ४००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे सायकलिस्ट दिलीप भरत मलिक ही होय.
दिलीप मलिक गुरुवारीच त्यांच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करून नागपूरला पोहचले तेव्हा लोकमतशी त्यांनी संवाद साधला. दिलीप मलिक नागपूर महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सायकल ही त्यांचे जीव की प्राण. सायकलस्वारी हा वडिलांकडून त्यांना मिळालेला वारसा आहे. कुठलाही प्रवास सायकलने करायचा, हे त्यांचे ठरलेले. सायकलने भटकंती करण्याची आसक्ती वयाच्या सातव्या वर्षापासून लागली ती आजही कायम आहे. अशी भटकंती करीत ४० वर्षात त्यांनी ५ लाख ८४ हजार किमीचा प्रवास सायकलने केला आहे. यावर्षी सायकलने देशाचा टप्पाटप्पा गाठायचा, हे उद्दिष्ट त्यांनी मनात बाळगले. मनपा प्रशासनाकडून परवानगी घेतली. त्यांच्या प्रवासासाठी महापालिकेने त्यांना नवीन स्पोर्टी सायकलही दिली. १५ आॅगस्ट रोजी त्यांचा हा प्रवास महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत व्हेरायटी चौक येथून सुरू झाला. त्यांच्यासोबत रामेश्वर चव्हाण हा तरुण सहकारीही प्रवासाला निघाला. ‘शहीद जवानांचा सन्मान, मुलगी वाचवा- मुलगी शिकवा, स्वच्छ भारत अभियान, वृक्ष लावा-वृक्ष जगवा’ हा संदेश देत ते प्रवासाला लागले. पुढे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली व काश्मीर या राज्यातून प्रवास करीत वाघा बॉर्डरवर समारोप झाला. यादरम्यान उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता दररोज १५० ते २०० किमीचा प्रवास करीत त्यांनी हा टप्पा गाठला. खांद्यावर आवश्यक साहित्य होते पण भोजनाची व्यवस्था रात्री मुक्कामाच्या ठिकाणी होत असे. काश्मीरच्या लेह लद्दाख भागात अंगावर थरकाप आणणाºया एका विपरीत प्रसंगाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. असे अनेक प्रसंग पार करीत १३ सप्टेंबर रोजी वाघा बॉर्डरवर प्रवासाच्या या टप्प्याची सांगता झाली.

सायकलवर १९ तिरंगा ध्वज
दिलीप मलिक यांनी त्यांची सायकल अनोख्या पद्धतीने सजविली होती. समोर बॅटरी व संदेशाचे फलक आणि मागे मोराचा पिसारा फुलावा तसे १९ तिरंगा ध्वज त्यांनी सजविले होते. हवेत डोलणारे हे ध्वज पाहून वाटेतील लोक आवर्जून विचारपूस करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मार्गात बहुतेक ठिकाणी लोकांनीच भोजनाची व इतर व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.

पुढच्या वर्षी ४५ हजार किमीचे लक्ष्य
दिलीप मलिक यांनी यापूर्वीच संपूर्ण भारताच्या बहुतेक भागाला सायकलने भेट दिली आहे परंतु हा प्रवास एखादे लक्ष्य ठरवून टप्प्याटप्प्याने झाला. यातून केवळ राजस्थान व नेपाळचा भाग सुटल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच २०२० मध्ये ४५ हजार किलोमीटरचे लक्ष्य ठेवत एकाच वेळी संपूर्ण भारताचे भ्रमण करण्याचे ध्येय त्यांनी निर्धारीत केले असून त्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे.

Web Title: Visit India on his bicycle to honor the jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.