Virus of 'cyber' crimes is increasing in Nagpur! | नागपुरात 'सायबर' गुन्ह्यांचा 'व्हायरस' वाढतोय!

नागपुरात 'सायबर' गुन्ह्यांचा 'व्हायरस' वाढतोय!

ठळक मुद्दे४४ महिन्यांत ३६८ गुन्हे दाखल : कोट्यवधींचा लावला चुना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही काळापासून उपराजधानीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘कॅशलेस’च्या युगात आता ‘ई-सेवा’ थेट मोबाईलपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ‘ई-क्रांती’सोबतच ‘सायबर क्राईम’च्या प्रकरणांमध्येदेखील वाढ होत आहे. २०१६ सालापासून ४४ महिन्यांत नागपुरात ‘सायबर क्राईम’ किंवा ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत ३६८ गुन्हे दाखल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील या वर्षी तर गुन्ह्यांचा वेग आणखी वाढला आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरातील ‘सायबर क्राईम’संदर्भात नागपूर पोलिसांकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. जानेवारी २०१६ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत ‘सायबर क्राईम’चे किती गुन्हे दाखल करण्यात आले, किती आरोपींना अटक करण्यात आली, हे प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी २०१६ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत ‘भादंवि’, ‘सायबर’ तसेच ‘आयटी अ‍ॅक्ट’ मिळून एकूण ३६८ गुन्हे दाखल करण्यात आले. यात २०१६ मधील ९६, २०१७ मधील ८१, २०१८ मधील १०८ व २०१९ वर्षातील ८ महिन्यांतील ८३ गुन्ह्यांचा समावेश आहे. ‘सायबर’ गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
‘फेक न्यूज’ प्रकरणी १२ गुन्हे
‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून मागील काही काळापासून ‘फेक न्यूज’चा प्रसार करण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. परंतु अशा ‘फेक न्यूज’चा प्रसार-प्रचार करणे काही जणांना महागात पडले आहे. यासंदर्भात नागपूर पोलिसांनी एकूण १२ प्रकरणात गुन्हे दाखल केले. २०१६ मध्ये ४, २०१७ मध्ये २ व २०१८-२०१९ मध्ये प्रत्येकी ३ गुन्हे दाखल झाले.

‘क्रेडिट-डेबिट कार्ड’च्या फसवणुकीचे प्रमाण अधिक
‘सायबर क्राईम’अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे ‘क्रेडिट-डेबिट कार्ड’च्या माध्यमातून फसवणुकीचे आहे. यासंदर्भातील ५१ गुन्हे ४४ महिन्यांत दाखल झाले, तर केवळ फसवणुकीचे ८९ गुन्हे नोंदविण्यात आले. ‘ऑनलाईन बुकिंग’संदर्भात ११ गुन्ह्यांची नोंद झाली, तर ‘आॅनलाईन बँकिंग’च्या माध्यमातून फसवणुकीचे ३७ गुन्हे नोंदविल्या गेले.

‘सायबर’ गुन्ह्यांची वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष          गुन्हे
२०१२      १५
२०१३      १९
२०१४     ४६
२०१५     ९८
२०१६     ९६
२०१७     ८१
२०१८     १०८
२०१९ (ऑगस्टपर्यंत) ८३

११२ गुन्हेगार सहभागी
माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार ४४ महिन्यांत ‘सायबर क्राईम’च्या गुन्ह्यात ११२ गुन्हेगार सहभागी होतील. एकूण गुन्ह्यांपैकी ६१ प्रकरणे सोडविण्यात पोलिसांना यश आले.

प्रमुख गुन्हे व नुकसान

प्रकार                                    गुन्हे              नुकसान (रुपयांमध्ये)
फसवणूक                             ५०                 ६,७९,७४,१५०
ऑनलाईन बुकिंग                  ११                      २,०५,८१४
ऑनलाईन फसवणूक           ३९                   १,४९,७६,५०८
डेबिट-क्रेडीट कार्ड फसवणूक ५१            ४३,३५,३८१
‘ऑनलाईन बँकिंग’ची फसवणूक ३७      ४६,७६,८७७
‘ओटीपी’तून फसवणूक              १७        २६,९८,६६८

 

Web Title: Virus of 'cyber' crimes is increasing in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.