‘व्हायरल’ने वाढवली चिंता; लहान मुलांमध्ये वाढला सर्दी, खोकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 22:11 IST2022-07-05T22:10:53+5:302022-07-05T22:11:23+5:30
Nagpur News कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच आता ‘व्हायरल’च्या रुग्णांतही वाढ झाल्याने चिंता वाढली आहे.

‘व्हायरल’ने वाढवली चिंता; लहान मुलांमध्ये वाढला सर्दी, खोकला
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच आता ‘व्हायरल’च्या रुग्णांतही वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. यात लहान मुलांमध्ये १०१-१०३ अंशापर्यंत जाणारा ताप, सोबत अंगदुखी व ‘थ्रोट इन्फेक्शन’चे अधिक रुग्ण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सध्या ऊन, अचानक पाऊस पडत आहे. बदलत असलेले हे वातावरण अनेक विषाणूंच्या जन्मासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळेच सध्या विषाणूजन्य आजार, घशाचा संसर्ग झालेले रुग्ण वाढले आहेत. खासगी इस्पितळांसोबतच शासकीय रुग्णालयात ‘व्हायरल’ तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मेडिकल आणि मेयो या रुग्णालयात या आजाराचे दिवसाकाठी १५-२० रुग्ण येत आहेत. वातावरण असेच राहिल्यास, यात आणखी वाढ होण्याची शक्यता डॉक्टर वर्तवित आहेत.
-पावसात भिजू नका
व्हायरल टाळण्यासाठी मुलांनी पावसात भिजू नये. स्वच्छता पाळावी, सोबतच गर्दीचे ठिकाण टाळणे आवश्यक असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-घशाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष नको
मुलांमध्ये हलका ताप, घशात खवखव, अन्नाचा घास गिळताना त्रास होणे आणि आवाजात बदल होणे यासारख्या समस्या उद्भवल्यास तुमच्या घशाला एखाद्या संसर्गाने जखडले आहे, असे समजावे. परंतु याकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे गरजेचे आहे.
-हे करा
:: शक्यतोवर पावसात ओले होऊ नये
:: उकळून थंड केलेले पाणी प्यावे
:: डासांपासून बचाव करावा
:: घरासह परिसर स्वच्छ ठेवावा.
:: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
:: व्हायरल असलेल्या रुग्णाच्या संपर्कात राहणे टाळावे.
बदलत्या वातावरणाचा परिणाम
बदलत्या वातावरणाबरोबर शरीराला जुळवून घेणे शक्य होत नाही. यातच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना या वातावरणाचा त्रास जास्त होताना दिसतो. लहान मुलांमध्ये या बदलांचा परिणाम त्यांच्यावर लगेच जाणवतो. यामुळे गेल्या काही दिवसांपासून व्हायरलच्या रुग्णांत वाढ झाली आहे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
-डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ