नागपूरमध्ये ‘शेतकरी बंद’ला हिंसक वळण
By Admin | Updated: June 5, 2017 14:59 IST2017-06-05T14:59:10+5:302017-06-05T14:59:10+5:30
शेतकरी संपावर या आंदोलनादरम्यान सोमवारी नागपूर जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला.

नागपूरमध्ये ‘शेतकरी बंद’ला हिंसक वळण
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 5 - शेतकरी संपावर या आंदोलनादरम्यान सोमवारी नागपूर जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, रामटेक शहरात भाजपा व शिवसेना कायकर्त्यांमध्ये हॉटेल बंद करण्यावरून सकाळी 11 वाजताच्या सुमारास वाद निर्माण झाल्याने तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन यांना जबर मारहाण केल्याने पोलिसांना नाईलाजास्तव लाठीमार करावा लागला.
शिवसेनेने शेतकरी आंदोलन आणि बंदला आधीच समर्थन जाहीर केले होते. रामटेक शहरात सकाळीपासून संपूर्ण बाजारपेठ बंदच होती. मात्र भाजपाचे नगरसेवक आलोक मानकर यांनी त्यांचे हॉटेल सुरूच ठेवल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हॉटेल बंद करण्याची वारंवार विनंती केली.
मानकर हॉटेल बंद करीत नसल्याचे लक्षात येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आत शिरून हॉटेलमधील साहित्य फेकायला सुरुवात केली. आलोक मानकर यांच्या सूचनेवरून भाजपाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करीत शिवसेनेचे माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन यांना जबर मारहाण करायला सुरुवात केली.
हा जमाव महात्मा गांधी चौकात पोहोचताच उपविभागीय पोलीस अधिकारी लोहीत मतानी तिथे दाखल झाले. त्यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत करीत बिकेंद्र महाजन यांना ताब्यात घेतले. परंतु, कुणीही ऐकायला तयार नसल्याने शेवटी पोलिसांनी लाठीमार केला.