ग्रामस्थांनी धरली शेताची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:14+5:302021-04-18T04:08:14+5:30
कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : ग्रामीण भागात काेराेना संक्रमण आणि मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे. काही काेराेना प्रतिबंधक ...

ग्रामस्थांनी धरली शेताची वाट
कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : ग्रामीण भागात काेराेना संक्रमण आणि मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे. काही काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करीत आहेत तर काही आजही बेजबाबदारपणेच वागत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी काहींनी सर्व जीवनावश्यक वस्तू व कुटुंबीयांना साेबत घेऊन शेताची वाट धरली. त्यांनी शेतात तंबू व झाेपडी तयार करून संसार थाटला आहे. काहींनी संसार थाटण्यासाठी चक्क ट्रॅक्टर व त्याच्या ट्राॅलीचा वापर केला आहे. याला सध्या सुरुवात झाली असून, आगामी काही दिवसात याचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने विविध उपाययाेजना केल्या. मात्र, काही नागरिक वारंवार आवाहन व सूचना करूनही त्या उपाययाेजनांचे पालन करीत नाही. याचा फटका साटक (ता. पारशिवनी) गावाला बसला. गावात काेराेनाचे संक्रमण आणि मृत्यूदर वाढत असल्याने भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले. त्यातच राजू भुते व गुणवंत ढबाले, दाेघेही रा. साटक या शेतकऱ्यांनी स्वत:सह कुटुंबीयांना काेराेनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या साटक शिवारातील शेतात राहण्याचा निर्णय घेत शेताची वाट धरली. काेराेना संक्रमणामुळे साटक गावात असलेली पूर्वीची वर्दळ फार कमी झाली आहे.
हा संपूर्ण भाग आदिवासीबहुल असून, या भागातील बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. यात राजू भुते व गुणवंत ढबाले यांचाही समावेश आहे. सध्या काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आराेग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. शहरातील हाॅस्पिटलमध्ये खाटा मिळत नाहीत. राजकीय नेते काही करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत काेराेनाची लागण झाली तर उपचारासाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाल्याने शेतात राहायला येण्याचा निर्णय घेतल्याचे या दाेन्ही शेतकऱ्यांनी सांगितले. असाच निर्णय इतर नागरिक घेत असल्याने गाव हळूहळू ओस पडायला सुरुवात झाली आहे.
राजू भुते त्यांच्या वृद्ध आई व इतर कुटुंबीयांसाेबत तर गुणवंत ढबाले त्यांची पत्नी, अदिती व आकांक्षा या दाेन मुलींसाेबत काही दिवसांपासून त्यांच्या शेतातच वास्तव्य करीत आहेत. दुसरीकडे, गावातील काही नागरिक आजही भामट्यासारखे गावभर विनाकारण फिरताना, कुठेही थुंकताना, गर्दी करताना दिसत आहेत. त्यांना वारंवार सूचना देऊनही ते साधा मास्क वापरण्याची तसदी घेत नाहीत.
...
ढगाळ वातावरणामुळे तारांबळ
या भागातील काही शिवाराची प्रत्यक्ष पाहणी केली असता, किमान चार ते पाच कुटुंबे शेतात झाेपडी किंवा तंबू तयार करून वास्तव्य करीत असल्याचे आढळून येते. या झाेपडी व तंबूंमध्ये विजेची काेणतीही सुविधा नाही. त्यामुळे काही कुटुंबे अख्खी रात्र अंधारात काढत आहेत. या भागात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, अधूनमधून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी काेसळत आहेत. वादळामुळे तंबूचे कापड उडून जात आहेत तर पावसामुळे धान्य व इतर साहित्य भिजत आहे. परंतु, गावाच्या तुलनेत शेतात सुरक्षित वाटत असल्याची प्रतिक्रिया राजू भुते, गुणवंत ढबाले यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
...
विलगीकरणाची समस्या
काेराेनामुळे शहरात राेजगारासाठी गेलेली मंडळी गावात परत आली आहे. त्यातच घराघरात काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जाताे. मात्र, अनेकांची घरे जुन्या पद्धतीची असल्याने त्यांच्या घरात स्वतंत्र खाेल्या नसल्याने विलगीकरणात राहायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर उपस्थित हाेताे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन गावातील समाजभवन अथवा शाळेच्या इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करीत नाही. त्यामुळे काही रुग्ण इच्छा नसतानाही त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात येत आहेत. यातून काेराेनाचे संक्रमणही वाढत आहे.