कळमना येथील ग्रामसेविका निलंबित
By Admin | Updated: June 1, 2014 01:02 IST2014-06-01T01:02:21+5:302014-06-01T01:02:21+5:30
तालुक्यातील कळमना येथील बहुचर्चित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या महाघोटाळय़ात येथील ग्रामसेविका संतोषी रामटेके यांच्यावर अनियमितता आणि कर्तव्यात

कळमना येथील ग्रामसेविका निलंबित
मनरेगा घोटाळा : कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका
अभय लांजेवार - उमरेड
तालुक्यातील कळमना येथील बहुचर्चित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या महाघोटाळय़ात येथील ग्रामसेविका संतोषी रामटेके यांच्यावर अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी या प्रकरणी आदेश काढत सदर ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई केली.
या प्रकरणात अनेकांनी हात धुतल्याचे बोलले जात असून, या कारवाईमुळे आता अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले आहेत. सदर कारवाईमुळे जिल्हाभरातील मनरेगाच्या कार्यप्रणालीवरही संबंधित अधिकार्यांचे बारकाईने लक्ष असून, कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर प्रकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंंत केवळ लोकमतने प्रकर्षाने लावून धरल्याने कळमना येथील महाघोटाळय़ाचे पितळ उघडे पडले, हे विशेष! महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ च्या कलम ६ अन्वये शिस्तभंगाची कारवाई केल्याचेही आदेशात म्हटले आहे. विभागीय चौकशी अंतिम निर्णयाचे अधीन राहून संतोषी रामटेके यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात स्पष्टपणे नमूद आहे.
संतोषी रामटेके यांना निलंबनाच्या कालावधीमध्ये पंचायत समिती उमरेड येथे मुख्यालयात हजर राहावे लागणार असून, खंडविकास अधिकारी अनिल निंबाळकर यांच्या परवानगीशिवाय त्यांना कार्यालय सोडता येणार नाही. त्याबाबतचे दरमहिन्याला प्रमाणपत्रही द्यावे लागेल, असेही आदेशात म्हटले आहे. पत्र क्रमांक १४१९ अन्वये दिनांक २७ मे २0१४ रोजी मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सदर निलंबनाचा आदेश काढला आहे.
.. अन् चौकशी सुरू झाली
१८ फेब्रुवारी रोजी मनीष गायकवाड आणि कळमना येथील गावकर्यांनी सर्वत्र तक्रारी केल्या. अधिकारी, लोकप्रतिनिधी ते थेट मंत्र्यांपर्यंंत तक्रारींचा गठ्ठा पोहचला. परंतु, तेवढय़ा तातडीने कुणीही फारशी दखल घेतली नाही.
अखेरीस १२ मार्च रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी प्रेमचंद अभय मिश्रीकोटकर यांनी दखल घेत गावात जाऊन प्रत्यक्ष चौकशी सुरू केली.
तक्रारकर्त्यांंचे म्हणणे ऐकले. ग्रामसेविका संतोषी रामटेके यांचीही बाजू त्यांनी समजून घेतली. त्यानंतर १४ मार्च, २६ मार्च आणि २ एप्रिल रोजी प्रत्यक्ष जाऊन मनरेगाच्या अंतर्गत कामांची व रेकॉर्डची पाहणी करण्यात आली.
यात अनेकांचे बयाणही यावेळी नोंदविण्यात आले. खंडविकास अधिकारी, अन्य अधिकारी, ग्रामसेवक संतोषी रामटेके आदींना लेखी व तोंडी निवेदन सादर करण्याची संधी देण्यात आली. या संपूर्ण चौकशीअंती आजी, माजी सरपंच, कर्मचार्याच्या दोन मुली तसेच अन्य व्यक्ती यांनी दर्शविलेल्या कालावधीमध्ये मनरेगाअंतर्गत कामावर मजूर म्हणून उपस्थित होवून काम केले नसताना त्यांची कामावर उपस्थिती दर्शवून त्यांचे बँक खात्यामध्ये दर्शविलेली रक्कम जमा करून आर्थिक अपहार केल्याचे उघडकीस आले आणि या घोटाळ्याचे बिंग फुटले.