आपल्याच माणसांसाठी गाव झाले परके : पुण्याहून आलेल्या तरुणाला परतवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 00:52 IST2020-05-16T00:47:57+5:302020-05-16T00:52:06+5:30
पुण्याला काम करणारा एक तरुण मिळेल त्या वाहनाने तर कधी अनेक किलोमीटरची पायपीट करीत गावात परतला. पण आपल्याच गावी गेल्यावर त्याला उपेक्षा सहन करावी लागली. गावकऱ्यांनी त्याला गावात ठेवण्यास नकार दिला.

आपल्याच माणसांसाठी गाव झाले परके : पुण्याहून आलेल्या तरुणाला परतवले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुण्याला काम करणारा एक तरुण मिळेल त्या वाहनाने तर कधी अनेक किलोमीटरची पायपीट करीत गावात परतला. पण आपल्याच गावी गेल्यावर त्याला उपेक्षा सहन करावी लागली. गावकऱ्यांनी त्याला गावात ठेवण्यास नकार दिला. पोलिसांच्या मदतीने त्याला मेडिकलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणी करून रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर गावात घेण्यात आले; पण १४ दिवस घरात क्वारंटाईन करण्यात आले.
कुही तालुक्यातील वेलतूर या गावी हा प्रकार घडला. हा तरुण पुण्याहून अनेक किलोमीटरची पायपीट करीत गावी पोहचला होता. मात्र गावात माहिती होताच पोलिसांना सांगून त्याला बाहेर काढण्याची सूचना करण्यात आली. पोलिसांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथून अॅब्युलन्समधून मेडिकलला आणण्यात आले. मेडिकलमध्ये त्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तो दिवसभर येथेच होता. नमुने निगेटिव्ह आल्यानंतर ते रिपोर्ट घेऊन तो गावी गेला. त्याला प्रवेश मिळाला पण १४ दिवस घरात क्वारंटाईन ठेवण्याची सूचना करण्यात आली.
गावागावात अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एका गावी औरंगाबादहून आलेल्या कुटुंबाला गावात येऊ देण्यात आले नाही. संपूर्ण कुटुंब गावाबाहेर शाळेच्या आवारात झोपण्यास मजबूर आहे. नागपूरला राहणारा भंडारा जिल्ह्यातील गोसे गावचा एक तरुण कामासाठी गावी गेला असता गावात थांबण्यास मनाई करण्यात आली. कंत्राटदार असलेली ही व्यक्ती काम सुरू असलेल्या ठिकाणी राहत आहे. कामासाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी शहरात आलेल्या लोकांना त्यांचे स्वत:चे गावच परके झाले आहे.