विजयादशमी : मंगळवारी ठिकठिकाणी होणार रावणदहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 22:31 IST2019-10-07T22:24:35+5:302019-10-07T22:31:36+5:30
भारतीय जनमानस परंपरागत पद्धतीने रावणाचा वध करून अर्थात दहन करून विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सोहळा साजरा करतात. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा होणार आहे.

विजयादशमी : मंगळवारी ठिकठिकाणी होणार रावणदहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवरात्रोत्सवाचा खऱ्या अर्थाने समारोप होतो तो दसऱ्याला. दुर्गेने हिरण्यकश्यपूचा वध केला तो दिवस आणि श्रीरामाने रावणाचा वध केला तो दिवस म्हणून विजयादशमीचे महत्त्व आहे. हिरण्यकश्यपू किंवा रावण, हे दोन्ही वाईट वृत्तीचे प्रतीक मानून भारतीय जनमानस परंपरागत पद्धतीने रावणाचा वध करून अर्थात दहन करून विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सोहळा साजरा करतात. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा होणार आहे.
रावणदहनाचा प्रमुख कार्यक्रम सनातन धर्म युवक सभेतर्फे कस्तूरचंद पार्क येथे साजरा होईल. दुपारी ४ वाजता शस्त्रपूजनानंतर रामलीलेतील काही प्रसंगांचे सादरीकरण येथे होईल आणि संध्याकाळी ६ वाजता रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाईल. शहरातील दुसरा मोठा कार्यक्रम महाल येथील चिटणीस पार्क मैदानावर पार पडेल. रावणदहन आयोजन समितीतर्फे रावणदहनाचा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० वाजता होईल. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी महापौर प्रवीण दटके, बडी मारवाडा माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष पुरुषोत्तम मालू, दयाशंकर तिवारी, संजय बालपांडे, विद्या कन्हेरे, सरला नायक उपस्थित राहतील. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक राधेश्याम सारडा, आरबीआय टास्क फोर्सचे सदस्य रमेश मंत्री यांचा सत्कार केला जाईल. तत्पूर्वी चिटणीस पार्क मैदानापर्यंत श्री शिरपूरकर राममंदिर, बडकस चौक येथून शोभायात्रा काढण्यात येईल. शोभायात्रेत श्रीराम, लक्ष्मण, हनुमान यांच्या प्रतिमांसह ढोलताशा, मिरवणूक पथक यांचा समावेश असेल. यासोबतच यशवंतराव चव्हाण सोशल फोरमतर्फे वर्धारोड येथील पूर्व समर्थनगरच्या मनपा मैदानात, वीर हनुमान मंदिरतर्फे नरेंद्रनगर येथील उज्ज्वल सोसायटीमध्ये, सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे गांधीनगर येथे रावणदहनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय, शहरातील विविध धार्मिक स्थळांवर विजयादशमी उत्सव साजरा केला जाणार आहे.
घरोघरी शमीपत्रांचे पूजन केल्यानंतर नागरिक सीमोल्लंघन करून एकमेकांना शुभेच्छा देतील. त्याअनुषंगाने दसरा मिलनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. यासोबतच विजयासाठीचा मार्ग सुकर व्हावा म्हणून विजयादशमीला विद्यारंभ करण्याची पारंपरिक प्रथा आहे. त्याअनुषंगाने काही धार्मिक स्थळांवर विद्यारंभ संस्कारांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.