जागरूक नागरिक घडविण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांची गरज - विजय दर्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2023 18:54 IST2023-03-26T18:48:28+5:302023-03-26T18:54:13+5:30
जागरूक नागरिक घडविण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांची गरज असल्याचे विजय दर्डा यांनी म्हटले.

जागरूक नागरिक घडविण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांची गरज - विजय दर्डा
आनंद डेकाटे
नागपूर : ‘आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीयच आहोत. त्यामुळे भारतीय असण्यावर गर्व करा. भाग्यापेक्षा कर्मावर विश्वास ठेवा आणि उदासीनता सोडून सक्रिय राहा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. बाबासाहेबांचे हे विचार नवीन पिढीने आत्मसात केले तर ते एक चांगले जागरूक नागरिक बनू शकतील. हे जागरूक नागरिक देशातीलच नव्हे जगातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतील, असे प्रतिपादन ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केले.
संघकाया फाऊंडेशन, नागपूर आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील पाली प्राकृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथील सभागृहात पाचवी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी संघकाया फाऊंडेशनचे अध्यक्ष भंते प्रशील रत्न, डॉ. सुशांत मेश्राम, भंते रूपेश, भंते रत्नसारा, मिथुनकुमार प्रमुख अतिथी होते.
विजय दर्डा म्हणाले, मी जैन धर्माचा अनुयायी असलो तरी मी विचाराने बाबासाहेबांचा अनुयायी आहे. जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म अहिंसा व मानवतेचा संदेश देतात. प्रकृतीच्या जवळ राहण्याची शिकवण देतात. विविध कर्मकांडापासून दूर राहण्याचे शिकवतात. दोन्ही धर्म हे समकालीन आहेत. मनुष्याला मनुष्य बनवण्याचे दोघांचेही विचार आहेत. ‘जगा आणि जगू द्या‘ ही भावना प्रत्येकाने आपल्या मनात रूजवली तर कुठलीच समस्या निर्माण होणार नाही, असेही दर्डा यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींना शासकीय रुग्णालयात उपचार करण्याचा कायदा झाला तर देशातील आरोग्य सुविधा सुधारू शकते, असेही त्यांनी सांगितले.
- जैन व बौद्ध धम्माची संयुक्त परिषद नागपुरात घेण्याचे आवाहन भंते प्रशील रत्न यांनी आपल्या भाषणात जैन व बौद्ध धम्माची संयुक्त परिषद मुंबईत घेण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. हा धागा पकडत विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात ही परिषद नागपुरात घ्यावी, असे आवाहन केले.
- तथागत बुद्धाच्या अभिधम्मावर मंथन
या परिषदेत तथागत बुद्धाचा अभिधम्म, अभिधम्मात विविध व्यक्तींचे विश्लेषण, अभिधम्म आणि प्रज्ञा, अभिधम्माचे मनोवैज्ञानिक आयाम अशा विविध पैलूंवर डॉ. बालचंद्र खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. मालती साखरे, डॉ. सुरजित सिंग, डॉ. तलत प्रवीण, डॉ शालिनी बागडे आदींनी मार्गदर्शन केले.