नव्या कोरोना संशयितांचा व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST2021-01-08T04:21:44+5:302021-01-08T04:21:44+5:30
नागपूर : मेडिकलच्या विशेष वॉर्डात नव्या कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण म्हणून दाखल असलेल्या आठ जणांनी ‘उपर से ऑर्डर है’ ...

नव्या कोरोना संशयितांचा व्हिडीओ व्हायरल
नागपूर : मेडिकलच्या विशेष वॉर्डात नव्या कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण म्हणून दाखल असलेल्या आठ जणांनी ‘उपर से ऑर्डर है’ नावाचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओतून त्यांनी प्रशासनाच्या ‘लालफितशाही’वर ताशेरे ओढले आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्याने खबरदारीचे उपाय म्हणून बाधित देशातून नागपुरात परतलेल्या आठ जणांना मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यात आले. मागील ८ ते १३ दिवसापासून ते वॉर्डात भरती आहेत. येथून सुटका कधी होणार या प्रश्नाला कुणीच उत्तर देत नव्हते. वरून ऑर्डर आहे, एवढेच सांगत होते. यातील एका जणाला व्हिडीओची कल्पना सुचली. त्याने याची माहिती इतरांना दिली. त्यांच्याकडून होकार मिळताच ‘गाईडलाईन्स कोई पढता नही, पेशंट की कोई सुनता नही, सिस्टम के आड मे डिसिजन कोई लेता नही, यहां की ब्युरोक्रसी मे फसना, जैसे मरना कयामत की रात मे... उपर से ऑर्डर है’ हे गाणे लिहिले. स्वत:च चालही दिली. व्हिडीओचा अनुभव असल्याने मोबाईलने त्याचे शुटींगही केले. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर अनेकांकडून पाहिला जात आहे.
व्हिडीओ शुटिंग करणाऱ्या त्या रुग्णाने सांगितले, मागील अनेक दिवसापासून बंदखोलीत असल्याने नैराश्य आले होते. आणखी किती दिवस काढायचे याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. सर्वच जण वरून ऑर्डर असल्याचे सांगून हात वर करीत होते. यातूनच ही कल्पना आली. व्हिडीओ बनविण्याचा छंद होताच. हा व्हिडीओ फिजिकल डिस्टन्सिंग पाळत तयार करण्यात आला. यात कुणा एकाला लक्ष्य केलेले नाही. केवळ लालफितशाहीवर बोट ठेवले आहे.