लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ निर्माण यात्रेतून निवडणूक जिंकण्याची स्फूर्ती मिळाली आहे. आता विदर्भवाद्यांनीच विदर्भ मिळविण्याचा निर्धार केला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य यंदा मिळवणारच, असा संकल्प विदर्भवादी नेत्यांनी शनिवारी नागपुरात केला.विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे २ जानेवारीपासून संपूर्ण विदर्भातून विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा शनिवारी सीताबर्डीतील माहेश्वरी सभागृहात समारंभपूर्वक समारोप झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी आम आदमी पक्षाचे देवेंद्र वानखेडे, बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुरेश माने, विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांच्यासह विदर्भवादी नेते मोरेश्वर टेंभूर्णे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अॅड. नीरज खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, माजी आमदार यादवराव देवगडे, राम नेवले, अरुण केदार, श्रीकांत तरार, विजया धोटे, राजू नागुलवार, रंजना मामर्डे, मुकेश मासूरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी अॅड. सुरेश माने म्हणाले की, निवडणुकांदरम्यान विदर्भद्रोही प्रचारही करू शकणार नाहीत, एवढी चेतना जनतेत निर्माण करू. १९८० मध्ये संपलेला विदर्भ आंदोलनाचा जलवा यंदाच्या निवडणुकीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकुमार तिरपुडे म्हणाले, ९५ टक्के लोकांना वेगळा विदर्भ हवा असला तरी राजकीय पर्याय जनतेपुढे नव्हता. विदर्भ निर्माण महामंचाकडून हा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. पदासाठी नाही तर विदर्भाचा नारा बुलंद करण्यासाठी निवडणुका लढवीत आहोत. इतरांचीही यावेळी भाषणे झाली.प्रास्ताविक राम नेवले यांनी केले. संचालन राजू नागुलवार यांनी केले.लोकमत चौकात भव्य स्वागत