आठवलेंची रिपाइं पुन्हा आणणार विदर्भाचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:08 IST2019-08-30T23:07:12+5:302019-08-30T23:08:13+5:30
केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचा सहकारी गट रिपाइं (आठवले) एकदा पुन्हा स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत ठराव आणणार आहे.

आठवलेंची रिपाइं पुन्हा आणणार विदर्भाचा ठराव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचा सहकारी गट रिपाइं (आठवले) एकदा पुन्हा स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत ठराव आणणार आहे. येत्या ६ सप्टेंबरला वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी १ वाजता होणाऱ्या या मेळाव्यात हा ठराव मांडण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत माहिती दिली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं(आठवले)चे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी राहतील. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पटेल आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत दलित, मागासवर्गीय, ओबीसी व व्हीजेएनटीमध्ये प्रचंड रोष आहे. राज्य शासनाने १९ डिसेंबर, २०१७ रोजी काढलेल्या अध्यादेशाने पदोन्नतीतील आरक्षण बंद करण्यात आले. उलट १० ऑक्टोबर २०१८ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार खुल्या प्रवर्गातील पदोन्नती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कनिष्ठ कर्मचारीही या परिपत्रकामुळे त्या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ ठरत आहे. याविरोधात मोठा मोर्चाही काढण्यात आला. राज्य सरकारने तातडीने यासंदर्भात निर्णय घेऊन पदोन्नतीतील आरक्षण लागू करावे व रोष संपवावा, अशी विनंती थुलकर यांनी केली. पत्रपरिषदेत राजू बहादुरे, राजन वाघमारे, विनोद थूल, डॉ. मनोज मेश्राम, सतीश तांबे, अॅड. भीमराव कांबळे आदी उपस्थित होते.
विधानसभेसाठी विदर्भातून सहा जागांची मागणी
आगामी विधानभा निवडणुकीसाठी पक्षाने राज्यात १६ जागांचे प्रस्ताव भाजपकडे दिले आहेत. यानुसार विदर्भातून ६ जागांची मागणी करण्यात आली असून, चार जागा मिळाव्यात अशी अपेक्षा थूलकर यांनी व्यक्त केली. यात वाशिम, मेहकर, उमरखेड, उत्तर नागपूर, चंद्रपूर आणि अर्जुनीमोरगाव या जागांचा समावेश आहे.