विदर्भाला मिळाले २२ नवीन पोलीस अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 08:00 IST2022-11-08T08:00:00+5:302022-11-08T08:00:10+5:30
Nagpur News भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने सोमवारी जारी केले. विदर्भाला यंदा २२ नवीन पोलीस अधिकारी प्राप्त झाले.

विदर्भाला मिळाले २२ नवीन पोलीस अधिकारी
योगेश पांडे
नागपूर : भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने सोमवारी जारी केले. विदर्भाला यंदा २२ नवीन पोलीस अधिकारी प्राप्त झाले. यात सर्वाधिक नवे अधिकारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपूरला मिळाले आहेत.
दोन आठवड्यांअगोदर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आणखी अधिकाऱ्यांच्या बदल्या दिवाळीनंतर होतील असे अपेक्षित होते. अनेकांनी विविध पद्धतीने प्रयत्नदेखील सुरू केले होते. गृह विभागाच्या यादीनुसार नागपूर शहराला सहा नवे उपायुक्त मिळाले असून एकूण १३ नवीन अधिकारी मिळाले आहेत. अमरावती जिल्ह्यात पाच नवे अधिकारी बदलून आले असून त्यात दोन उपायुक्तांचा समावेश आहे.
औरंगाबाद एसीबीचे अधीक्षक राहुल खाडे यांची अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. तर पुणे पोलीस उपायुक्त सागर पाटील व पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे तांत्रिक सेवा अधीक्षक संभाजी कदम यांची अमरावती पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे. नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक मारुती जगताप यांची अमरावतीच्या एसीबीच्या अधीक्षकपदाची तर राकेश कलासागर यांच्याकडे अमरावती रा. रा. पोलीस बल समादेशकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय पुण्यातील आर्थिक गुन्हेशाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची चंद्रपूर रा. रा. पोलीस बल समादेशक, मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त भरत तांगडे यांची वाशिमच्या अपर पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. नांदेड येथील अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची वर्धा अपर पोलीस अधीक्षकपदी तर अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अशोक थोरात यांची खामगाव अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.