शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विजयोत्सव
By Admin | Updated: June 13, 2017 01:59 IST2017-06-13T01:59:49+5:302017-06-13T01:59:49+5:30
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विजयोत्सव
शासनाचे अभिनंदन : अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. नागपुरातही सोमवारी शेतकरी संघटना, जय जवान जय किसान संघटनेतर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याजवळ लक्ष्मीभुवन चौक धरमपेठ येथे सोमवारी सकाळी फटाके फोडून व मिठाई वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. तसेच सरकारने सरसकट कर्जमाफी केल्यामुळे शासनाचे, मुख्यमंत्र्यांचे व सर्व मंत्र्यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. दोन दिवसात थकीत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असा इशाराही देण्यात आला. यावेळी अरुण वनकर, किशोर चोपडे, शरद खेडीकर, विजयकुमार शिंदे, सतीश इटकेलवार, रवी इटकेलवार, अविनाश गोतमारे, जयंत घोडमरे, मिलिंद महादेवकर, मंगेश पात्रीकर, ऋषिकेश जाधवसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दुसरीकडे शेतकरी संघटनेतर्फे गिरीपेठ येथील संघटनेच्या कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेतकरी कर्जमुक्ती ही शेतकरी आंदोलनाचे यश असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी छोटेखानी बैठकही घेण्यात आली. यात राम नेवले यांच्यासह अरविंद देशमुख, अरुण केदार, श्याम वाघ, अॅड. नंदा पराते, मदन कामडे, सतीश दाणी, जयंतराव चितळे, राम घोडे, डॉ. मीनाक्षी वाढबुद्धे, भय्याजी माकोडे, माया चवरे, डॉ. पुरुषोत्तम भोंडे, दिलीप घोरमारे, प्रभाकर काळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.