फायर सेफ्टी डिव्हाईस प्लॅन लालफितशाहीत अडकल्यामुळे गेले बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:45+5:302021-01-13T04:17:45+5:30
फायर सेफ्टी डिव्हाईस प्लॅन लालफितशाहीत अडकल्याने गेले बळी २०११ पासून भंडारा रुग्णालयात अग्निशमन प्रणालीच नाही - जळीतकांडानंतर धक्कादायक वास्तव ...

फायर सेफ्टी डिव्हाईस प्लॅन लालफितशाहीत अडकल्यामुळे गेले बळी
फायर सेफ्टी डिव्हाईस प्लॅन लालफितशाहीत अडकल्याने गेले बळी
२०११ पासून भंडारा रुग्णालयात अग्निशमन प्रणालीच नाही - जळीतकांडानंतर धक्कादायक वास्तव उघड - उपकरण खर्चाच्या पत्राला केराची टोपली
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडाऱ्याच्या रुग्णालयात आग विझवण्याचे गेल्या नऊ वर्षांपासून कोणतेही उपकरण नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविल्यानंतर कागदोपत्री हालचाल झाली. मात्र फायर सेफ्टी डिव्हाईस प्लॅन लालफितशाहीत अडकून पडल्याने १० निष्पाप जीवांचे बळी गेले. भंडारा जिल्हा रुग्णालयातील थरारक जळीतकांडानंतर हे जळजळीत वास्तव पुढे आले आहे.
रोज सुमारे ७०० ते ८०० रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची भंडारा जिल्हा रुग्णालयात वर्दळ असते. दोन दशकांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या या इमारतीत आग लागू शकते आणि आग लागल्यास तेथे चांगली फायर सेफ्टी डिव्हाईस (अग्निशमन सुरक्षा यंत्रणा) असायला पाहिजे, हे ध्यानात आल्याने भंडाऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते विकास देवेंद्र मदनकर यांनी आवाज उठविला. त्यांनी प्रशासनाच्या लक्षात तो प्रकार आणून दिला. नंतर या रुग्णालयात आग लागल्यास कोणती अद्ययावत उपकरणे उपलब्ध आहे, त्यासंबंधाने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली. त्यानंतर २०११ पासून या रुग्णालयात कोणतीही अत्याधुनिक अग्निशमन उपकरणे उपलब्ध नसल्याचे उघड झाले. रुग्णालयात आग लागल्यास नगर परिषदेकडून फायर ब्रिगेड बोलवून घेतली जाईल, असे कोडगे उत्तर २४ जुलै २०१८ ला सामान्य रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने मदनकर यांना माहितीच्या अधिकारात दिले. त्यानंतर मदनकर तसेच अन्य काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. तेव्हा ढेपाळलेले प्रशासन जागे झाले. आग लागल्यास भयंकर आक्रित घडू शकते. त्यामुळे तेथे अद्ययावत अग्निशमन सुरक्षा प्रणाली उभारण्यासाठी काय करता येईल, यावर विचार झाला. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी कार्यकारी अभियंत्यांकडून १ कोटी ५२ लाख, ४४, ७८३ रुपये खर्चाचा फायर सेफ्टी डिव्हाईस प्लॅन तयार करून घेतला. हा प्लॅन आणि निधीच्या मागणीचे पत्र ८ मे २०२० ला आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना पाठविले. ते पत्र धूळखात पडल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा १५ जूनला दुसरे पत्र पाठविण्यात आले. मात्र, संबंधित वरिष्ठांकडून त्याला तत्परतेने प्रतिसाद मिळाला नाही. फायर सेफ्टी डिव्हाईस प्लॅन लालफितशाहीत अडकून पडल्याने शनिवारी पहाटे आक्रित घडले. १० नवजात शिशूंचे जीव गेले. आता यंत्रणा डोळ्यात अंजन घातल्यासारखी खडबडून जागी झाली. आता संपूर्ण राज्याची यंत्रणाच भंडाऱ्याकडे डोळ्यावरचे झापड उघडल्यासारखी बघू लागली आहे.
अवघ्या दीड कोटींच्या सुरक्षा उपकरणांच्या मागणीपत्राकडे दुर्लक्ष करणारी सरकारी यंत्रणाही आता आपले पाप झाकण्यासाठी तत्परतेने कामी लागली आहे.
---
डीडींचा नो रिस्पॉन्स
या घडामोेडीच्या अनुषंगाने आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करण्याचा लोकमतने प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फायर सेफ्टी डिव्हाईस प्लॅनचे घोडे अडविण्यासाठी नेमके जबाबदार कोण ते स्पष्ट होऊ शकले नाही.
---