नागपूरनजीक पारडीत बॉयलरने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 20:08 IST2020-06-04T20:07:36+5:302020-06-04T20:08:56+5:30
काजूच्या छिलक्यापासून तेल तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा अपघात घडून एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश राजू आकरे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो भंडारा मार्गावरील खरबी नाक्याजवळ राहात होता.

नागपूरनजीक पारडीत बॉयलरने घेतला बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काजूच्या छिलक्यापासून तेल तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा अपघात घडून एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश राजू आकरे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो भंडारा मार्गावरील खरबी नाक्याजवळ राहात होता.
पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापसी उमिया वसाहतीत काजूच्या छिलक्यापासून तेल तयार करणाºया कंपनीचा कारखाना आहे. येथे महेश आकरे कार्यरत होता. २९ मेच्या सकाळी ८.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे आकरे तिथे काम करीत असताना तेल तयार करणाºया बॉयलर मशीनचा व्हॉल्व्ह जाम झाला. त्यामुळे आतमधील गॅस बाहेर जाऊ शकली नाही. आतमधून प्रचंड दबाव वाढल्यामुळे तेलाच्या बॉयलरचे झाकण वर उडाले आणि त्यातील उकळते तेल आकरेच्या अंगावर पडले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी रात्री ११.३४ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चंद्रशेखर लीलाराम निमजे (वय ३४, रा. मौदा) यांनी पारडी पोलिसांकडे माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
कुटुंब झाले निराधार
गरीब परिवारातील सदस्य असलेल्या आकरे याच्यावर घरच्या कुटुंबाचा गाडा चालविण्याची जबाबदारी होती. त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा परिवार निराधार झाला असून, परिवारातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाना मालक त्याच्या मृत्यूची भरपाई कशी करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.